मच्छीमारांच्या जाळ्यात मागील ३ दिवस बंपर कानट मासा मिळत आहे. ३ ते ४ टन मासा जाळ्यात सापडत असल्याने मच्छीमार सुखावले आहेत. हा मासा फिशमिल कंपन्यांना प्रक्रिया करण्यासाठी विकला जातो. बंपर मासा मिळाल्याने कंपन्यांना काही काळ खरेदी थांबवावी लागली. अल्पावधीतच खरेदी पुन्हा सुरू झाली. ऑगस्ट महिन्यात ट्रॉलिंग, गिलनेटद्वारे मासेमारीला आरंभ झाला. त्यानंतर महिन्याभरात शासनाच्या निर्देशानुसार पर्ससिननेट मासेमारीला सुरू झाल्यानंतर आरंभीलाच किनाऱ्यायापासून २० ते २२ वाव खोल समुद्रात जाळ्यात कानट मासा मिळू लागला आहे.
दरवर्षी सुरवातीच्या कालावधीत हा मासा मिळतो. साधारपणे ४ सप्टेंबरपासून हा मासा सापडण्यास सुरुवात झाली. सलग ३ दिवस नौकांना मासा मिळत होता. फिशमिल कंपन्यांमध्ये सुरुवातीला किलोला २२ रुपये दर मिळाला होता. सध्या दहा ते बारा रुपये किलोने फिशमिल कंपनीत विकत घेतला जात असल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात आले. या माशांवर प्रक्रिया करून त्यापासून बनवलेले ऑईल किंवा पावडर निर्यात केले जाते. दरम्यान, फिशमिल कंपन्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक मासा प्रक्रियेसाठी येऊ लागला. त्यानंतर काही कालावधीतच कंपन्यांनी खरेदी बंद केली होती. ३ दिवसानंतर कानट मिळण्याचा ओघ कमी झाला आहे. सध्या पाचशे ते हजार किलोपर्यंतच मासा मिळत आहे.