बंदी असलेल्या एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीतील पर्ससिननेट नौकेवर मत्स्य विभागाच्या गस्ती पथकाने कारवाई केली. अवघ्या १५ वावांमध्ये ही मासेमारी सुरू होती. या प्रकरणी एलईडी जप्त करण्यात आली असून, नौका राजिवडा बंदरात स्थानबद्ध करण्यात आली आहे. बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे ५ लाखांच्या दंडाची कायद्यात तरतूद आहे. ख्वाजा ए हिंद असे पकडलेल्या नौकेचे नाव आहे. सहायक मत्स्य आयुक्त अभयसिंह शिंदे इनामदार यांच्या नेतृत्वाखाली परवाना अधिकारी चिन्मय शिंदे, नाट्ये परवाना अधिकारी तावडे, सुरक्षारक्षक आदींनी ही कारवाई केली. बुधवारी (ता. २०) रात्री गस्ती नौका रत्नागिरी सागरी हद्दीमध्ये गस्त घालत होती.
तेव्हा पहाटे साडेचारच्या सुमारास रत्नागिरीपासून सुमारे १५ वावामध्ये बंदी असलेल्या एलईडीद्वारे एक नौका मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आले. गस्ती पथकाने तत्काळ या नौकेवर ताबा मिळवला. नौकेवरील एलईडी लाईट जप्त करण्यात आले. नौका ताब्यात घेऊन ती राजिवडा बंदरात स्थानबद्ध करण्यात आली. या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात एलईडी मासेमारी सुरू असल्याचे उघड झाले आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘ख्वाजा ए हिंद’ बोटीवर दंडात्मक कारवाई होईल. लवकच हे प्रकरण सुनावणीसाठी सहाय्यक मत्स्य आयुक्त यांच्याकडे ठेवले जाणार आहे.