जिल्ह्यात सोमवारी (ता. २) जोरदार पावसाला सुरुवात झाली. समुद्री किनारी भागात वेगवान वारे वाहत असल्यामुळे मासेमारी ठप्प झालेली आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बदललेल्या वातावरणाचा परिणाम मासेमारीवर झाला असून, २५ टक्के नौकाच समुद्रात मासेमारीसाठी गेल्या आहेत. नौकांना मासळी मिळत नसल्यामुळे बाजारात सुरमई, पापलेट, सरंगा महागले आहेत. फिश मिल कंपन्यांना विकली जाणारी छोटी मासळी मिळत असून कंपनीकडून कमी दराने खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे मच्छीमारांची अवस्था दयनीय झाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य बंदरातील नौका किनाऱ्यावरच उभ्या आहेत. काही नौका वादळाच्या परिस्थितीमध्येही समुद्रात गेल्या होत्या.
मात्र, त्यांनाही अपेक्षित मासळी मिळालेली नाही. त्यामधून नौकांचा रोजचा खर्चही बाहेर पडत नाही. सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी ८.९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात पावसाचा जोर होता. गेले चार दिवस अधुनमधून सरी पडत होत्या. आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर पावसाला जोरदार सुरुवात झाली. सध्या सुरू असलेला पाऊस समाधानकारक असल्यामुळे बळाराजा सुखावला आहे. हळवी भात बियाण्यांची रोपं गणपतीनंतर कापणी योग्य होणार असून निमगरवी प्रकारच्या भात रोपांना लोंब्या भरू लागल्या आहेत. गरवी प्रकारच्या भात रोपांमध्ये लोंब्या येण्यास सुरवात झाली आहे. निमगरवी आणि गरवी भातांना सध्या थोड्याफार प्रमाणात रोपांना पाण्याची गरज लागते.
मासळीचे दर वधारले – १ ऑगस्टपासून फिशिंग करणाऱ्या नौका सुरू झाल्या. सुरवातीला चांगला रिपोर्ट मिळाला. चिंगळ, गेजर, पापलेट, सुरमई याचा रिपोर्ट बऱ्यापैकी होता. मात्र ऑगस्टच्या अखेरीला बदललेल्या वातावरणाचा मोठा फटका मासेमारी व्यवसायाला बसला आहे. मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. मागील आठवडाभरापासून रिपोर्ट नसल्याने मच्छीमार आर्थिक संकटात आहेत. पावसाळ्यानंतरची नौकांची आवश्यक ती दुरुस्ती वेळेत होऊ शकली नाही. आर्थिक अडचणीमुळे खलाशी आणि तांडेल नौका मालकांना आणता आले नाहीत.