नवरात्र सुरू असल्याने देवीची आराधना मनोभावे सुरू आहे. अनेकांनी उपवासही धरले आहेत. धार्मिक उत्सवामुळे मासे खाणाऱ्या खवय्यांची संख्या घसरली असून, बाजारपेठेत दरही गडगडले आहेत. बहादूरशेख नाका येथील मच्छीमार्केटमध्ये मच्छीची आवक वाढली; पण मासळीला उठावच नाही. शहरातील बहादूरशेख नाक्यावर मासळीचा मोठा बाजार भरतो. येथे चांगली आणि ताजी मासळी मिळते. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील लोक मासळी खरेदीसाठी येथे येतात. पावसाळ्यात ६० दिवस मासेमारी बंद होती. त्यानंतर १ ऑगस्टपासून पुन्हा हंगाम सुरू झाला; मात्र खराब हवामान, विविध वादळांमुळे हवामान विभागाने सातवेळा धोक्याचा इशारा दिला. किमान २०-२२ दिवस मासेमारी बंद ठेवावी लागली होती.
या दरम्यान मासळीची आवक कमी झाल्याने भाव गगनाला भिडले होते. आता महिनाभरापासून मासेमारीला जोरदार सुरुवात झाली. त्यामुळे विक्रेत्यांकडे मासळीची आवक वाढली. सोमवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्याने खवय्यांची संख्या कमी झाली आहे. मासळीला उठाव नसल्याने भाव घसरले असल्याची माहिती येथील मच्छीविक्रेते सर्फराज बेबल यांनी सांगितली. बाजारात सुरमई, पापलेट, कोळंबी, हलवासारखी महाग मासळी आता ३०० ते ५०० रुपये किलोच्या दराने विकली जात आहे.
मच्छीमारांना फटका – बाजारात मासळीला उठाव नाही, याचा मच्छीमारांना चांगलाच फटका बसला आहे. बाजारात विक्रीतून मिळणाऱ्या भावापेक्षा कमी दराने हे विक्रेते मासळी विकत आहेत. काही विक्रेते टेम्पोने आणि तीनआसनी रिक्षाने ग्रामीण भागात जाऊन मासळी विकत आहेत. आधीच ग्राहक नसल्यामुळे येथील विक्रेते हैराण झालेले असताना दापोली तालुक्यातील काही महिला चिपळुणात येऊन मासळी विकत आहेत. त्यामुळे स्थानिकांना ग्राहक मिळत नाहीत, अशी परिस्थिती झाली आहे.