23.9 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

विराट कोहली एक हजारी क्लबमध्ये सामील होणार…

यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या...

या दिवशी थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पहा…

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20...

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची...
HomeRajapurअणुस्कुरा घाटात दरड कोसळली - वाहतूक ठप्प

अणुस्कुरा घाटात दरड कोसळली – वाहतूक ठप्प

मातीच्या ढिगाऱ्यासोबत रस्त्यामध्ये मोठमोठे दगड आले होते.

कोकण परिसराला घाटमाथ्याशी जोडणारा आणि शॉर्टकट मार्ग म्हणून वाहनचालकांच्या पसंतीस उतरलेल्या अणुस्कुरा घाटामध्ये आज पहाटेच्या दरम्यान दरड कोसळली. यामुळे या मार्गावरील वाहतूक पहाटेपासून ठप्प झाली आहे. दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; मात्र मोठे दगड रस्त्यावर आले असल्याने दरड बाजूला करण्यामध्ये अडथळे येत असून हा मार्ग रात्री उशिरापर्यंत बंदच होता. घाटातील पिकनिक स्पॉटपासून वरच्या बाजूला काही अंतरावर ही दरड कोसळली आहे. त्यामुळे अणुस्कुरा घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे कसोशीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत; मांत्र त्यामध्ये यश आलेले नाही. मातीच्या ढिगाऱ्याखाली मोठे दगड असल्याने रस्ता मोकळा करण्याच्या कामामध्ये व्यत्यय येत आहे. त्यामुळे घाटरस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्याचे आव्हान बांधकाम विभागासमोर आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणामुळे मुंबईतून कोकणात येणारी वाहने पुणेमार्गे अणुस्कुरा घाटातून कोकणात येण्याला पसंती देताना दिसत आहेत. त्याचवेळी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांकडूनही याच रस्त्याला प्राधान्य दिले जात आहे.

त्यातून नागमोड्या वळणांचा आणि उताराचा असलेल्या अणुस्कुरा घाटमार्गातून सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. आज पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान घाटामध्ये दरड कोसळली. त्यामध्ये मातीच्या ढिगाऱ्यासह मोठमोठे दगड रस्त्यामध्ये येऊन रस्ता पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे घाटमार्गातील वाहतूक पहाटेपासून ठप्प झाली आहे. त्याऐवजी घाटमाथ्यावर जाण्यासाठी वा तिकडून कोकणात येण्यासाठी अन्य पर्यायी मार्गांचा वाहनचालकांकडून उपयोग केला जात आहे.

बंद झालेला घाटमार्ग मोकळा करण्यासाठी सकाळपासून बांधकाम विभागाचे अभियंता स्वप्नील बावधनकर आणि सहकाऱ्यांकडून तत्काळ प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यामध्ये जेसीबी आणि तीन डंपरच्या साह्याने माती बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रस्त्यामध्ये आलेले गड ब्रेकरच्या साह्याने फोडण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत घाटरस्ता मोकळा झालेला नव्हता.

या पावसाळ्यातील दुसरी घटना – जून महिन्यामध्ये अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळण्याची घटना घडली होती. त्यावेळी मातीच्या ढिगाऱ्यासोबत रस्त्यामध्ये मोठमोठे दगड आले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिवसभराच्या प्रयत्नानंतर घाटमार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला होता. त्यानंतर, गेल्या सुमारे दीड-दोन महिन्याच्या कालावधीमध्ये घाटमार्गामध्ये कोणतीही पडझड वा दरड कोसळण्याचा प्रकार घडलेला नव्हता. आज पहाटे कोसळलेली दरड ही यावर्षीच्या पावसाळ्यातील दुसरी घटना आहे.

RELATED ARTICLES

Most Popular