बदलापूर येथील घटनेचा येथील व्यापाऱ्यांनी निषेध केला. राजापूर तालुका व्यापारी संघाने केलेल्या आवाहनानुसार, येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद न ठेवता आज काळ्या फिती लावून निषेध केला. बदलापूरसह देशामध्ये महिलांवर अत्याचाराच्या घडलेल्या घटनांमधील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी व्यापारी संघाने केली आहे. याबाबत निवेदन व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि पोलिसांना दिले. बदलापूरच्या घटनेचा निषेध म्हणून राज्यातील महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानंतर त्यामध्ये बदल करण्याची भूमिकाही घेतली होती.
बंदमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन बाजारपेठ बंद ठेवल्याने व्यावसायिक नुकसान आणि सर्वसामान्य जनतेला त्रास होतो. हे टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध करण्याचा निर्णय राजापूर तालुका व्यापारी संघाने घेतला होता. निवेदन देताना राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, खजिनदार दीनानाथ कोळवणकर, प्रकाश कातकर, विनोद पवार, विनय गादीकर, माजी नगरसेवक अभय मेळेकर, राजापूर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष विवेक गादीकर, संदेश टिळेकर, गणेश नार्वेकर उपस्थित होते.
पाचल बाजारपेठेतही निषेध – बदलापूर येथे झालेल्या अमानुष अत्याचाराचा पाचल बाजारपेठ येथे पाचल व्यापारी संघटना आणि महाविकास आघाडी यांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी शिवसेनचे (उबाठा) माजी जिल्हाउपप्रमुख अशोक सक्रे, शिवसेनेचे तालुका युवाधिकारी सुरेश ऐनारकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर नारकर, संदीप बारसकर, विनायक सक्रे, माजी सरपंच विलास नारकर, सुरेश साळवी, सुनील जाधव आदी उपस्थित होते.