जिल्ह्यात घरफोड्यांचा सिलसिला कापम असून राजापूर तालुक्यात माण्णार-धनगरवाडी येथील तीन आणि कुंभवडे-हरचेलीवाडी येथील दोन अशी पाच घरे फोडून दुचाकीसह ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार सोमवारी (ता. १३) रात्री ६ ते मंगळवारी (ता. १४) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडला. यासह मंडणगड तालुक्यात घुत्रोली-हनुमानवाडी येथे भरदिवसा वृद्धेच्या घरातून सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने लांबविले. त्याची बाजारातील किंमत पाच लाखांपर्यंत आहे. हा प्रकार आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला, राजापूर तालुक्यातील कुंभवडे-हरचेतीवाडी येथील सुहास भगवान मणचेकर (रा. कुंभवडे-हरचेलीवाडी) यांनी नाटे पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून नाटे पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाणार-धनगरवाडी येथील गणपत वरक, प्रकाश वरक व अन्य एक अशा तीन जणांची बंद घरे चोरट्यांनी फोडली.
बंद घराच्या दरवाजांचे कुलूप दगडाने तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. गणपत वरक यांच्या घराच्या कपाटातील रोख ४० हजार रुपये, तसेच दहा हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबविली, तर चोरट्यांनी घरातील साहित्याची नासधूसही केली. तर कुंभवडे येथील सुहास मणचेकर, वैशाली मयेकर यांची घरे फोडून चोरीचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्या हाताला काहीच लागले नाही. नाटे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. घटनास्थळी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. चोरट्याचा माग काढण्यात यश आले नाही. याबरोबरच दोन दिवसांपूर्वी नाणार, पाळेकरवाडी येथील सुरेश मरतू प्रभू यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे ११ हजार रुपये किमतीचा स्मार्ट टीव्ही चोरून नेल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुढच्या दाराला कडी… – मंडणगड तालुक्यातील धुत्रोली (हनुमानवाडी) येथे भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्याने वृद्धेच्या घरातून सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने व रोकड असा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. सरस्वती सुगदरे (वय ६५) या नातवाला शाळेतून आणण्यासाठी घराला आतून कडी लावून मागील दरवाजाला बाहेरून कुलूप लावून गेल्या होत्या. चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाची आतून लावलेली कडी उचकटून घरात प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर चोरट्याने कपाटातील सोन्याच्या अंगठ्या, बांगड्या, कानातले दागिने असे चार तोळ्यांचे दागिने आणि काही रोख रक्कम चोरून नेली.
सरस्वतीबाई दुपारी घरी परतल्यावर त्यांना संशय आला. त्यांनी ग्रामस्थांना बोलावले. घरातील कपाट तपासल्यावर दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मंडणगड पोलिस ठाण्यास देण्यात आली. सूचना मिळताच पोलिस निरीक्षक नितीन गवारे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. चोरीला गेलेल्या दागिन्यांचे वजन सुमारे चार तोळे असून, त्याची किंमत अंदाजे पाच लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.

 
                                    