तालुक्यातील कुंभवडे-नाणार परिसरात एकाच रात्रीत ५ घरफोड्या झाल्याची घटना ताजी असताना आता कळसवली येथील एक घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २ लाख २० हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरट्यांचा उच्छाद वाढत चालल्याने ग्रामस्थांमध्ये पसरले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, कळसवली वाणीवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक शरद त्र्यंबक साखळकर हे ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पत्नीसह पनवेल सुखापूर येथे त्यांच्या मुलांकडे राहण्यासाठी गेले होते. त्यांनी घराला लॉक लावून घराची चावी ही त्यांचे शेजारी राहणारे मधुसुदन गोपाळ म्हाडदळकर यांचेकडे दिली होती. गुरूवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी कळसवली येथील त्यांच्या शेजारी राहणारे वैभव श्रीकांत ठाकुरदेसाई यांनी त्यांना फोन करुन घराचे पाठचे व पुढचे दोन्ही दरवाजे उघडे आहेत.
तसेच घरातील सर्व सामान विस्कटलेले आहे व घरातील कपाट फोडलेले आहे अशी माहिती दिली. त्यानंतर साखळेकर हे त्यांची पत्नी व मुलांसमवेत पनवेलहून त्यांच्या राहत्या घरी म्हणजे कळसवली येथे आले असता त्यांच्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील सुमारे १ लाख रूपये किंमतीचे ४० वर्षापूर्वीचे एक सोन्याचे मंगळसुत्र, १ लाख रूपये किंमतीच्या दोन बांगड्या, २० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे व मोत्याचे कानातले दागीने व ५०० रूपये किमतीची दोन निरंजने, एक चांदीचा अगरबत्ती स्टॅन्ड, चांदीचे करंडे असा सुमारे २ लाख २० हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

