मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या आडून रत्नागिरी जिल्ह्यात नवी खाजगी सावकारी फोफावल्याचे आरोप होऊ लागले असून या सावकारीने रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावात एका महिलेचा बळी घेतला आहे. तर हप्ता आणि व्याज मिळत नाही म्हणून संबंधित व्यक्तीच्या पत्नीलाच सावकाराने स्वतः च्या घरी डांबून ठेवण्याचा प्रकारही घडला आहे. या वसुलीची पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी देखील दखल घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मायक्रो फायनान्स कंपन्यानी नियमबाह्यरित्या आणि महिलांची आर्थिक ऐपत लक्षात न घेता बेसुमार कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे हजारो महिला कर्जाच्या सापळ्यात अडकल्या आहेत. अनेक कंपन्यांनी पहिले कर्ज फिटण्यापूर्वी दुसरे, तिसरे कर्ज दिले आहे. तसेच नियम डावलून आठ-आठ, दहा-दहा कंपन्यांनी एकाच व्यक्तीला कर्ज दिले आहे, असे आरोप होत आहेत. त्या कर्जावरील व्याजाचा दर असुरक्षित कर्ज म्हणून २४ ते ३६ टक्क्यांपर्यंत असतात. त्यामुळे मासिक हप्त्याची रक्कम दहा-पंधरा हजारापासून ३०-४० हजारापर्यंत गेली आहे.
कर्जाचा हप्ता वसूल करण्यासाठी कंपन्यांचे एजंट दादागिरी आणि दांडगाई करीत असतात, असा आरोप होतो आहे. हे लक्षात घेऊन सायंकाळी ६ नंतर कोणताही वसुली एजंट महिलेच्या घरी पैशांची वसुली करण्यासाठी गेल्यास नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. वसुलीसाठी अपशब्दांचा वापर, घरात चार-चार तास बसून राहणे, रात्री अपरात्री घरी जाणे, असे प्रकार सर्रास केले जात आहेत. एजंट पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही, याची कल्पना असल्यामुळे घरातील सोनेनाणे, आंब्याच्या बागा गहाण टाकण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे बहुसंख्य कर्जबाजारी महिलांची स्थिती अंगावर फुटका मणी राहिला नाही, अशी झाली आहे. त्यामुळे अनेक महिला सावकारांकडून पैसे घेऊन हप्ते भरत आहेत. परंतु, खासगी सावकारांच्या व्याजाचे दर हे दरमहा दहा ते पंधराच नव्हे तर अगदी २० टक्क्यांपर्यंत (वार्षिक १२०, १८० ते अगदी २४० टक्क्यांपर्यंत) आहेत.
वास्तवात खाजगी सावकारीला वेसण घालण्यासाठी सरकारने कायदा केलेला असून त्यानुसार १०.५ ते कमाल १८ टक्क्यांपर्यंत (मासिक दीड टक्का) व्याज घेण्यास परवानगी आहे. मात्र खासगी सावकार वारेमाप दराने व्याज वसुली करीत असून व्याज वसुलीसाठी धमक्या देणे, अर्वाच्य शब्दांत दमबाजी करणे असे प्रकार सर्रास होत आहेत. रत्नागिरीमध्ये घडलेल्या दोन घटना या प्रातिनिधिक असून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात या माध्यमातून नवी खाजगी सावकारी फोफावली आहे. यात भयावह आर्थिक शोषण होत आहे. त्यामुळे सरकारने गावागावातील पोलीस पाटलांच्या माध्यमातून खाजगी सावकारीची माहिती घ्यावी व त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रवक्ते प्रभाकर नारकर, प्रदेश सचिव संजय परब, जिल्हाध्यक्ष जगदिश नलावडे, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष युयुत्सु आर्ते आणि कोकण जन विकास समितीचे सुरेश रासम, नम्रता जाधव, संग्राम पेटकर, दिनेश राणे यांनी केली आहे.