रत्नागिरीसह सिंधुदुर्गमधील वन्य प्राण्यांच्या बचावासाठी वनविभागाच्या खारफुटी व सागरी जैवविविधता प्रतिष्ठानच्या सहकार्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांच्या माध्यमातून रूग्णवाहिका पुरविली आहे. चार दिवसांपूर्वीच येथील विभागीय वनाधिकारी कार्यालयात ही रूग्णवाहिका दाखल झाल्याने वनविभागाच्या सध्याच्या ताफ्यात आणखी एक अत्याधुनिक वाहनाची भर पडली असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
निसर्ग संपन्नतेने समृद्ध असलेल्या कोकणात हिंस्त्र व इतर वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. अनेक वेळा मानवी वस्तीमध्ये देखील हे हिंस्र पशु भूक भागवण्यासाठी येत असतात. अनेक वेळा मनुष्यावर देखील ते हल्ले करताना दिसतात. मनुष्य वस्तीत देखील अशा प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी आणि आपला जीव वाचवण्यासाठी प्राण्यांवर प्रतिहल्ला देखील केला जातो. त्यामुळे अशा जखमी, संकटात सापडलेल्या अथवा लोकवस्तीत शिरलेल्या वन्य प्राण्यांचा बचाव करून सुरक्षितरित्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त करण्याचे काम सध्या खाजगी वाहनाने केले जाते.
खाजगी वाहनाची रचना आणि त्यामध्ये पिंजरा ठेवताना फार अडचणी निर्माण होतात. एक प्रकारे कसरतच करावी लागते. अशा परिस्थितीत वन्यजीव रूग्णवाहिकेचा वापर सार्थकी लागणार आहे. वनविभागाच्या खारफूटी व सागरी जैव विविधता प्रतिष्ठानच्या सहकार्याने बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या माध्यमातून सागरी जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक वन्यजीव रूग्णवाहिका पुरविली आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समावेश केला गेला आहे. त्यामुळे हि वन्य जीवांसाठी वापरण्यात येणारी रुग्णवाहिका अनेक जीवांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांच्या उपचारासाठी उपयुक्त ठरणार आहे.