देशाच्या राजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्यानं वाढत आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांमध्ये १ हजार ११८ रुग्णांची नोंद झाली आहे. अशातच दिल्ली पाठोपाठ आता देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही हळूहळू कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील १० दिवसांमध्ये मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत जवळपास ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
देशात गेल्या २४ तासांत कोरोना व्हायरसच्या २ हजार ८९७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५४ लोकांचा मृत्यू देखील ओढावला आहे. यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढली असून ती १९ हजार ४९४ वर पोहोचली आहे. तर कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट ०.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयानं याबाबत एक परिपत्रक जारी केलं असून त्याबाबतच्या विस्तृत सूचना सर्व झोनना देण्यात आल्या आहेत. यामध्ये सततचा वाढणारा कोरोनाचा धोका लक्षात घेता, प्रवाशांनी मास्कचा वापर करावा असं सांगण्यात येत आहे. मास्क हि सक्ती नाही पण स्व संरक्षणासाठी वापरावा असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
दिल्लीसारख्या काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्या राज्यामध्ये मास्कची सक्तीही करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत त्या राज्यांमधून इतरत्र प्रवास करताना मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये मास्कचे बंधन मुक्त करण्यात आले आहे. अशा राज्यांमध्ये प्रवास करताना जर एखाद्याने मास्क वापरला नाही तर त्याचा दंड लागणार नाही, पण तरीही प्रवाशांनी मास्कचा वापर करावा असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येतंय. रेल्वेचा प्रवास करत असाल तर मास्क घाला असं रेल्वे प्रशासनाच्यावतीने प्रवाशांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वे प्रवास करताना मास्कची सक्ती नाही हेही रेल्वेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.