‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांची निकषानुसार छाननी सुरू झाली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात चारचाकी असलेल्या बहिणींच्या नावांची पडताळणी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. त्यानुसार अपात्र बहिणींची नावे तत्काळ वगळण्यासही सुरुवात झाली आहे. त्यामुळे चारचाकी असलेल्या लाडक्या बहिणींची यादी अजून जिल्हा प्रशासनाकडून तालुका पातळीवर आलेली नाही. त्यामुळे चिपळूणमधील नेमक्या किती लाडक्या बहिणींच्या नावे चारचाकी आहे हे अजून समजलेले नाही; मात्र अंगणवाडी सेविकांकडून या संदर्भातील सर्वेही सुरू झाला आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करून महिलांना दीड हजारांचा लाभ दिला. यामध्ये चिपळूण तालुक्यातील ४३ हजार ८३१ लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते. यातील ४२ हजार १३८ लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर होऊन त्यांच्या खात्यावर पैसेही जमा झाले. ६२ महिलांचे अर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत आणि १ हजार ६३५ अर्ज नामंजूर झाले आहेत.
आता लाभार्थी महिला किंवा तिच्या कुटुंबीयांच्या नावावर चारचाकी असल्यास त्यांचा लाभ बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे; मात्र, थेट घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे प्रशासनाकडून टाळले जात आहे. कारण, ज्या नावांची यादी प्रशासनाला राज्याकडून प्राप्त झाली आहे त्यांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामध्ये केवळ अंगणवाडी सेविकांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांची नावे कळवून खातरजमा करून घेतली जात आहे. त्यामुळे आता हे जवळपास निश्चित झाले आहे की, किमान शासनाकडून जिल्हा प्रशासनाला आलेल्या यादीतील नावे अपात्र करण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या पातळीवर सुरू केली आहे; मात्र ती यादी अजून तालुकापातळीवर एकात्मिक बालविकास केंद्राकडे प्राप्त झालेली नाही.