शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून सेवानिवृत्त शिक्षिकेसह त्यांच्या ओळखीतील सुमारे २० ते २५ लोकांची १ कोटी ८७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार दापोलीत उघडकीला आला आहे. या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून सेवानिवृत्त शिक्षिका मनिषा विलास मालगुंडकर (रा. पंचनदी दापोली) यांची ३३ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. दापोली पोलीस स्थानकात दिलेल्यानुसार पोलिसांनी जालगाव – दापोली येथील हर्ष अजय काताळकर, जय अजय काताळकर, देव संजय काताळकर, संजय अनंत काताळकर व राज संजय काताळकर या ५ जणांविरोधात भा. दं. वि. सं. कलम ४२०, ४०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार तक्रारदार मनिषा मालगुंडकर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, सन २०२०/२१ मध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत त्याच्या घरी खिडक्यांना ग्रील बसवायच्या कामासाठी संजय काताळकर, राज काताळकर हे आले होते. त्यांनी आम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करतो व भरपुर पैसे कमवतो, आम्ही सर्वानी कंपनी देखील सुरु केली आहे. तुम्ही देखील आमच्याकडे गुंतवणुक करु शकता, असे सांगितले. त्यांनी त्यांचा प्रमुख हर्ष काताळकर कसे पैसे कमावतो हे देखील सांगितल. तसेच तो जालगांव येथे क्लासेस घेतो. ते तुम्ही ऑनलाईन पहा असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार महिला व त्यांचा मुलगा अथर्व याने ऑनलाईन क्लासेस चालु असल्याबाबत खात्री केली.
२० जानेवारी २०२३ ते दि. २५ मे २०२३ दरम्यान त्यांनी एकून २३ लाख रुपये गुंतवणूक केली. दरम्यानच्या मुदतीत हर्ष काताळकर यांने शेअर घेवुन विकुन फायदा झाल्याचे सांगुन त्यांच्या बँक खात्यावर वेळोवेळी पाठवुन एकुन १,७४,०००/- रुपये परत दिले. हर्ष काताळकर यांने आमच्या पैशाचे घेतलेले शेअर सर्टिफिकेटस आम्हाला दिले नाहीत. या दरम्यान आपला मुलगा अक्षय विलास मालगुंडकर हर्ष काताळकर यांच्या बँक खात्यावर वेळो वेळी ८ लाख रुपये पाठविले तर पती विलास अनंत मालगुंडकर वेळो वेळी २ लाख रुपये पाठविले. हर्ष काताळकर यांने सुरु केलेली एच. के बुल्स अकॅडमी ओ. पी. सी. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये अन्य काही लोकांनीही गुंतवणूक केली आहे. काही लोकांना परतावा मिळू लागल्याने आणखी काही लोकांनी गुंतवणूक केली.
आपल्या खात्यामधुन २३ लाख रुपये, मुलगा अक्षय विलास मालगुंडकर यांचे कडुन ८ लाख रुपये, पती विलास अनंत मालगुंडकर यांचे कडुन २ लाख रुपये, तसेच अभिषेक विजय वाडेकर यांचे कडुन १ कोटी २५ लाख रुपये, आकाश अरुन नरवणकर यांचे कडुन २९ लाख रुपये ६० हजार रुपये असे एकुन १ कोटी ८७ लाख ६० हजार रुपये हर्ष अजय काताळकर यांचे बँक खात्यावर जमा केले असुन अद्याप आम्ही दिलेले पैसे आम्हाला परत मिळाले नाहीत किंवा घेतलेले शेअर्स प्रमाणपत्र देखील दिलेले नाहीत, म्हणुन आम्हा सर्वांची फसवणुक झालेली आहे. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.