रत्नागिरीचा तहसीलदार असल्याची बतावणी करून महिलेची ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुभाष जगन्नाथ गणवीर उर्फ सुभाष वानखेडे (रा. नालंदानगर, नागपूर) असे संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.याबाबत पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार, वाईन – शॉपचा परवाना मिळवून देतो, असे सांगून संशयित आरोपी सुभाष याने आपणाकडून सुमारे ७० लाख रुपये उकळल्याचा गंभीर आरोप करणारी तक्रार संध्या अशोक पुण्यानी (५६, रा. नागपूर येथील जयराम कॉलनी बेलतरोडी) या महिलेने फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून ‘बेलतरोडी पोलिसांनी सुभाषविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संध्या यांचा पती अशोक धाग्यांचा व्यापार करत होता. २०११ साली संध्या व तिचा पती यांची ओळख झाली होती. दरम्यान २०१५ मध्ये आजारपणाने संध्या यांच्या पतीचे निधन झाले. आपण रत्नागिरीत तहसीलदार म्हणून काम करतो, असे सुभाषने त्यांना सांगितले होते. अनेकदा त्याला घरी जावे लागे, म्हणूनच त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. संध्याचा मुलगा रौनकचा अपघात झाला आणि त्याच्या मेंदूचे ऑपरेशन झाले. त्याचा अभ्यास थांबला होता. सुभाषने त्याला हवे असल्यास दारू दुकानाचा परवाना मिळू शकतो, असे सांगितले. यामुळे मुलाचे भविष्य घडेल. सुभाषने सांगितले होते की, त्यांच्याकडे दारू दुकानाचा परवानाही आहे, पण सरकारी कर्मचारी असल्याने तो दुकान उघडू शकत नाही, अशी बतावणी सुभाषने संध्या यांना केली. परवान्याचे नूतनीकरण करून घेण्यासाठी त्याने संध्याच्या पतीकडे १६ लाख रुपयांची मागणी केली. नंतर तो परवाना त्यांच्या नावावर करून घेण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून सुभाष त्यांच्याकडून मोठी रक्कम घेत होता. तर दुकानासाठी जागा घेण्याच्या नावाखाली तर कधी रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी पैसे घेत असे. २०१३ ते २०१९ या काळात त्याने संध्या व तिच्या पतीकडून ७० लाख रुपये घेतले होते, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
संध्याने दुकानात जाण्यासाठी दबाव टाकला तेव्हा त्याने तिचे फोन. उचलणे बंद केले. यावेळी संध्या हिने रत्नागिरीतील शासकीय कार्यालयांशी संपर्क साधला. यात सुभाष वानखेडे नावाचे तहसीलदार नसल्याचे आढळले. प्रत्यक्षात सुभाषचे पूर्ण नाव सुभाष जगन्नाथ गणवीर असल्याचे समोर आले. सुरुवातीपासून तो पुनियानी दाम्पत्याकडून बहाण्याने पैसे घेत होता. संध्याने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.