जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. गेल्या मे महिन्यात तालुक्यातील जयगड येथील एकाला शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स वाढणार आहेत, असे भासवून तसेच जास्त नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीस भाग पाडून २१ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. योग्य आणि प्रशिक्षण घेऊनच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तर अलीकडे शेअर मार्केट बोगस लिंक तयार करून तसेच मोबाईलधारकांना शेअर मार्केटचे जास्त नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगून फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याचे चित्र आहे.
प्रसारमाध्यमातून ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांची जनजागृती केली जाते; परंतु जास्त नफ्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांच्या संख्या वाढतच आहे. फसवणूक करणाऱ्या संशयिताविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्ष वर्मा (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही.) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना २३ मे ते २२ जुलै २०२४ या कालावधीत घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोम्या कान्ती नियोगी (रा. जेएसडब्ल्यू टाऊनशिप झोन-२ चाफेरी विनायकवाडी, रत्नागिरी) यांच्या मोबाईलमध्ये मार्केट मास्टर हब जीओ- १ या व्हॉटस् अॅप ग्रुपला संशयिताने सोम्या याला जॉईंट करून घेतले. तो स्वतः ग्रुपचा अॅडमिन होता.
संशयित हर्ष वर्मा याने एका मोबाईल क्रमांकावर साईट तयार करून घेतली आणि साईटवर फिर्यादी यांचे अकाऊंट तयार करून घेतले आणि ती लिंक फिर्यादी यांना पाठवून ती ओपन करण्यास सांगून सोम्या यांना सोशल मीडियावर वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स ५ टक्के व १० टक्के वाढणार आहेत, असे भासवले. तसेच कमी वेळात जास्त नफ्याचे आमिषही दाखवले. शिवाय फिर्यादी यांना पैसे गुंतवण्यास सांगितले. फिर्यादी यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असून, संशयिताने २१ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सोम्या नियोगी यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अंमलदार करत आहेत.