उरण येथील यशश्री शिंदे हिला न्याय मिळण्याबरोबरच तिच्या हत्येविरोधात निषेध मोर्चा सुरू असताना एका महिलेने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच मंदिरातील पुजाऱ्यांकडून महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचाराविरोधात चिपळूण व्यापारी महासंघटनेने कडकडीत बंद पाळला. चिपळूण पालिकेपासून प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढून प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना निवेदन दिले. मोर्चेदरम्यान व्यापाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. निवेदनानुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी उरण येथील तरुणी यशश्री शिंदे हिची निघृण पद्धतीने हत्या करण्यात आली.
या खुन्याला कडक शासन होण्यासंदर्भात सरकारने योग्य पाठपुरावा करावा, असे निवेदनात नमूद केले आहे. कडकडीत बंदमुळे वैद्यकीय आणि इतर वैद्यकीय सेवा सुरू होत्या. तसेच शाळा, कॉलेज शैक्षणिक संस्था सुरू होत्या. काही मटण विक्रेत्यांनी मध्यरात्री दोन ते पहाटे सहापर्यंत दुकाने सुरू ठेवली होती. हॉटेल आणि मद्य विक्रीची दुकाने मात्र दिवसभर बंद होती. शहरातील खाटीक आळी, पद्मा चित्रमंदिर परिसर, चिंचनाका, भोगाळे, भेंडीनाका, मुरादपूर, महाराष्ट्र हायस्कूल परिसर, बहादूरशेख नाका येथे पोलिस आणि राखीव सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.
चिंचनाका येथे पोलिसांची वाहने उभी करण्यात आली होते. गोवळकोट रोड आणि गोवळकोट मोहल्ला येथे दुचाकीवरून पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू होते. शहरातील मशिदींच्या परिसरात पोलिस बंदोबस्त होता. शहरातील बाजारपेठ १०० टक्के बंद राहिल्यामुळे रस्ते मोकळे होते. रस्त्यांवर तुरळक वाहनांची संख्या दिसत होती. अत्यावश्यक सेवेतील दुकाने चालू असली तरी त्या ठिकाणी ग्राहक फार दिसत नव्हते. त्यामुळे चिपळूण व्यापारी महासंघाने पुकारलेला बंद शंभर टक्के यशस्वी ठरला.
यावेळी चिपळूण व्यापारी महासंघटनेचे किशोर रेडीज, उदय ओतारी, सूर्यकांत चिपळूणकर, अभिनव भुरण, हेमंत शिरगावकर, संदेश भालेकर, परिमल भोसले, अरूण भोजने, तसेच शेकडो व्यापारी उपस्थित होते. किशोर रेडीज व उदय ओतारी यांनी महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत तीव्र संताप व्यक्त करून आरोपींना कडक शासन व्हावे, हे खटले फास्ट ट्रॅकवर चालले पाहिजेत, अशी मागणी केली.
यावेळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्यासह पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रिक्षा संघटनाही सहभागी – उरण येथील यशश्री शिंदे हिच्या हत्येच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनेतर्फे गुरुवारी मोर्चा काढला. संध्याकाळी व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन शुक्रवारी चिपळूण बंदचे आवाहन केले. यानुसार आज चिपळूण बाजारपेठेत पूर्ण कडकडीत बंद पाळलो. एकंदरीत सर्वच व्यवहार ठप्प झाल्याचे पाहावयास मिळाले. रिक्षा संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या असल्याचे रिक्षा संघटनेचे दिलीप खेतले यांनी सांगितले.