27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeKhedखेडमध्ये हजारो महिलांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या भामट्यांकडून ४ योजनांचा फंडा

खेडमध्ये हजारो महिलांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या भामट्यांकडून ४ योजनांचा फंडा

महिला बचतगटातील ८३९ महिलांची २१ लाख १८ हजार रूपयांची फसवणूक.

तालुक्यातील महिला बचत गटातील तब्बल ९६८ महिलांची आतापर्यंत २६ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘त्या’ २ भामट्यांनी शासनातर्फे महागडी शिलाई मशीन, घरकुले, घरघंटी व गोठा सवलतीच्या दरात देण्याचा फंडा वापरत गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे. या भामट्यांनी शासनाच्या आणखी कोणत्या योजनांचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे का? याचाही पोलीस पडताळा करत आहेत. या भामट्यांचे सर्व कारनामे उघडकीस आणण्यासाठी येथील पोलिसांनी कंबर कसली आहे. तालुक्यातील महिला बचत गटातील शेकडो महिलांकडून लाखो रुपये उकळत पोबारा केलेल्या महाराष्ट्र क्रांती सेना संघटनेचा अध्यक्ष संदीप शंकर डोगरे (वाराणी – कासार, जि. बीड) याच्या येथील पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर आर्थिक फसवणुकीचे नवनवे कारनामे पोलीस तपासात उजेडात येत आहेत.

त्याचा फरारी असलेला सहकारी बबन मारुती मोहिते याचाही पोलिसांना सुगावा लागला असून त्यालाही लवकरच जेरबंद करण्याची तयारी येथील पोलिसांनी केली आहे. त्याच्या अटकेनंतरही महिलांच्या फसवणुकीचे आणखी प्रताप उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र क्रांती सेना संघटनेच्या माध्यमातून शासनाकडून १६०० रूपयांमध्ये महागडी हातशिलाई मशिन व घरकुल मिळवून देण्याचे आमिष दाखवत सुरुवातीला तालुक्यातील महिला बचतगटातील ८३९ महिलांची २१ लाख १८ हजार रूपयांची फसवणूक केल्याची ७ जुलै रोजी पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल झाल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर तालुक्यातील महिलांना शासनाच्या माध्यमातून सवलतीच्या दरात घरकुल व उद्योग सुरू करून देतो, असे आमिष दाखवत ९९ महिलांची २ लाख २५ हजार ६० रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार ६ ऑगस्ट रोजी फसवणूक झालेल्या महिलांनी पोलीस स्थानकात दाखल केली होती. या दोन फसवणुकीच्या गुन्ह्यानंतर तपास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर, पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे यांनी तपासाला गती देत संदीप डोंगरेला गजाआड केले. या भामट्याच्या अटकेनंतर आर्थिक फसवणूक झालेल्या महिलांनी पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक नितीन भोयर केले होते.

त्यानुसार आणखी ३० महिलांनी फसवणुकीची तिसरी तक्रार नोंदवली आहे. शासनाकडून गोठ्यांच्या कामासाठी अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवत प्रत्येकी १० हजार रुपये व सवलतीच्या दरातील घरघंटीसाठी प्रत्येकी ४ हजार रुपये अशा ३ लाख ४४ हजार रुपयांना गंडा घातल्याचे तक्रारीत नमूद केले असून त्यानुसार तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत फसवणूक झालेल्या ९६८ महिलांकडून भामट्यांनी कागदपत्रेदेखील जमा केल्यामुळे त्यांच्यावरील विश्वास अधिक बळावला होता. मात्र या दोन भामट्यांनी तालुक्यातील गरजू महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे अखेर उघड झाल्याने त्यांना धक्काच बसला आहे. या फसवणूक प्रकरणातील भामट्यांचे सर्व कारनामे उघडकीस आणण्यासाठी येथील पोलिसांनी तपास गतिमान केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular