सागरी मार्गावरील पावस बसस्थानक सुसज्ज होण्यासाठी एमआयडीसी अंतर्गत ९९ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पावस बसस्थानकाचे रूपडे पालटणार आहे. या कामाला सुरुवात झाली आहे. पावस बसस्थानकामध्ये शौचालयाची दयनीय अवस्था झाली होती. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुसज्ज शौचालय बांधण्यात आले. त्यानंतर बसस्थानक सुसज्ज व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. प्रवाशांच्या मागणीचा विचार करून एमआयडीसी अंतर्गत बसस्थानक बांधण्यासाठी ९९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. त्या कामाचा प्रारंभ करण्यात आला.
या संदर्भात माहिती घेतली असता बसस्थानक चिरेबंदी बांधकाम करून इमारतीवर पत्रा सेट करून त्यावर मंगलोरी कौले बसवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर बसस्थानक परिसराचे सिमेंट काँक्रिटने बांधकाम करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सागरी मार्ग आणि बसस्थानक यामधून जाणाऱ्या गटाराचे बांधकाम करण्यात येणार आहे, जेणेकरून डोंगर उतारावरून येणारे पाणी त्वरित न थांबता नदीपात्रात जाईल.
बसस्थानकाला बांधणार संरक्षण भिंत – बसस्थानकाजवळ संरक्षण भिंत घालून परिसर बंदिस्त करण्यात येणार आहे. जेणेकरून इतर खासगी वाहने त्या ठिकाणी ठेवता येणार नाहीत. कारण, सध्या बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी वाहने लावली जातात. संरक्षण भिंतीमुळे एसटी वाहतुकीला अडथळा येणार नाही. सागरी महामार्ग असल्याने या मार्गावर एसटीच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे हे बसस्थानक प्रवाशांसाठी सुसज्ज करण्यात येणार आहे.