तालुक्यातील तिवरे धरणाच्या पुनर्बाधणीसाठी ६३ कोटी रुपयांच्या निधीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाल्याने दसपटी विभागातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या धरणाच्या पुनर्बाधणी निधीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विशेष सहकार्य करून चिपळूणवासीयांवर असलेले प्रेम सिद्ध केले आहे आणि ते ऋण आपण कधीच विसरू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार शेखर निकम यांनी दिली आहे. तिवरे येथील धरण २ जुलै २०१९ ला मंगळवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास फुटून भेंदवाडीतील २४ जण बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.
या घटनेत माणसांसह जनावरेही वाहून गेली. वाडीतील अनेक घरे जमीनदोस्त झाली. या धरण फुटीनंतर येथील पंचक्रोशीत पाण्याची टंचाई जाणवू लागली. यामुळे तिवरे धरणाची पुनर्बाधणी आवश्यक आहे, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून जोर धरू लागली. यासाठी आमदार शेखर निकम यांनी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. अखेर सोमवारी राज्यमंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत धरणाच्या पुनर्बाधणीसाठी ६३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.
तिवरेवासीयांना दिलेला शब्द पुरा – तिवरे धरणाच्या पुनर्बाधणीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर ६३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत, जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. तिवरेवासीयांना दिलेला शब्द पूर्ण झाला, असे आमदार निकम यांनी सांगितले.