मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वेने देखील चाकरमान्यांच्या सोयीसाठी ५० गणपती स्पेशल ट्रेन चालविण्याची घोषणा केली. या गाड्यांचे आरक्षण रविवारी (२८ जुलै) सकाळी सुरू होताच गाड्या झाल्या. त्यामुळे चाकरमान्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वेच्या स्पेशल ट्रेनचे तिकीट देखील काही मिनिटांतच फुल्ल झाल्याने तिकीट आरक्षणात गैरप्रकार होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत चौकशी करण्याची मागणी चाकरमानी करीत आहेत. यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून, त्यानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची रेल्वेच्या तिकिटासाठी धडपड सुरू आहे. दरवर्षी सुमारे ४ लाख चाकरमानी कोकणात येतात.
३ वर्षांपासून पश्चिम रेल्वे गणपतीसाठी सहा विशेष फेऱ्या चालविते. मात्र, या गाड्यांच्या वेळा मात्र फारच गैरसोयीच्या आहेत. मुंबई सेंट्रल ते ठोकूर ही गाडी दुपारी १२ वाजता मुंबई सेंट्रल येथून सुटते व रात्री १० वाजून ५० मिनिटांनी कृणकवली, ११ वाजून ४० मिनिटांनी सावंतवाडीला पोहचते. मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी ट्रेन देखील दुपारी १२ वाजता सुटून कणकवलीला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी आणि सावंतवाडीला मध्यरात्री अडीच वाजता पोहोचते. बांद्रा टर्मिनस ते कुडाळ स्पेशल ट्रेन पहाटे साडेतीन वाजता कुडाळ स्थानकात पोहोचते. अशा रात्री-अपरात्री गाड्या कोकणात गेल्यावर चाकरमान्यांना आपल्या घरी जायला खासगी वाहनांशिवाय पर्याय नसतो.
गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी येत असतात. त्यात रेल्वेने जाणाऱ्यांची संख्या जवळपास दोन लाख आहे. यंदा ३ ते ७ सप्टेंबर दरम्यानच्या कोकणात जाणाऱ्या सर्व नियमित गाड्या फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे चाकरमान्यांच्या सोयीसाठी गणेशोत्सवानिमित्त २०२ गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य, कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर पश्चिम रेल्वेने पश्चिम उपनगरातील चाकरमान्यांच्या सोयीसाठी ५० गणपती स्पेशल ट्रेन चालविण्याची घोषणा केली होती. या गाड्यांचे आरक्षण सुरू होताच फुल्ल झाल्या. त्यामुळे ‘कुछ तो गडबड है भाई’ अशी चर्चा सुरु झाली असून केवळ काही मिनिटात सर्व तिकिटे कशी काय संपतात याची चौकशी करावी अशी मागणी चाकरमानी करत आहेत.