रत्नागिरी तालुक्यातील गावडे-आंबेरे विठ्ठल रुक्मिणी उत्सव मंडळ व पूर्णगड सागरी पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बिगर यांत्रिकी नौकानयन स्पर्धेत परिसरातील बारा संघांनी सहभाग घेतला होता. येथील खाडीमध्ये नौकानयनाचा थरार रंगला होता. ही स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी झाली होती. यामध्ये किंग कोळी संघाने प्रथम क्रमांक पटकावला. गावडे-आंबेरे येथील विठ्ठल रखुमाई उत्सव मंडळाचे हे ३४ वर्ष असून या मंडळाच्या माध्यमातून कार्तिकी एकादशी दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. कोरोनामुळे स्पर्धा घेण्यात आल्या नव्हत्या.
मात्र यंदा पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या सहकायनि यंदा बिगर यांत्रिकी नौकानयन स्पर्धा प्रथमच घेण्यात आल्या. त्याला परिसरातील खारवी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये बारा संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये किंग कोळी या संघाने प्रथम, चिवट खारवी संघाने दुसरा आणि माऊली संघाने तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेच्या पारितोषिक बितरणावेळी तरुणांना मार्गदर्शन करताना पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव म्हणाले, खारवी समाजातील प्रत्येक तरुणाने होडी चालवण्याचे व पोहण्याचे प्रशिक्षण घेणे व त्यात पारंगत झाले पाहिजे.
खारवी समाजाची शेती व बागायती म्हणजेच समुद्र आणि खाडी आहे, त्या ठिकाणी मच्छीमारी व्यवसाय करताना पोहता येणे व होडी चालवणे या गोष्टी तरुणांना आल्या पाहिजेत, तरच त्याला आपला व्यवसाय करणे सोपे जाईल. प्रत्येकाने आपल्या परिसराचे संरक्षण करण्यासाठी सक्षम राहिले तर इतरांना सतर्क करणे गरजेचे आहे. त्यांच्या कोणत्याही हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तरच किनाऱ्याचे संरक्षण होऊ शकते. यावेळी सरपंच लक्ष्मण सारंग, उपसरपंच वैभव नाटेकर, उत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.