रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या आणि दरवर्षी पावसाळ्यात खेड शहराला पुराच्या पाण्याने वेढणाऱ्या खेडमधील जगबुडी नदीमधील गाळ काढण्याच्या कामाला गेल्या ४ दिवसांपासून सुरवात झाली आहे. मात्र या जगबुडी नदीमधील गाळ काढण्याच्या कामाला दररोज येणारी भरती ओहोटी आणि महाकाय मगरींचा मोठा व्यत्यय निर्माण होत आहे. त्याचठिकाणी जलसंपदा विभागामार्फत साठवून ठेवलेल्या गाळाच्या ढिगाऱ्यांवर अनेक मोठं मोठ्या महाकाय मगरींनी आपला कब्जा केला आहे. दुसरीकडे भरती-ओहोटीमुळे उपसलेला गाळ पुन्हा नदीपात्रात पसरत असल्यामुळे या नदीतील कोट्यावधी रुपये खर्चुन गाळ काढणाऱ्या जलसंपदा विभागासमोर आता पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. खेड शहराला सतत पुराचा धोका जगबुडी नदीमुळे निर्माण होतो. खेड शहरात पुराचे पाणी शिरते आणि शेकडो व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते.
या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार गेल्या वर्षी २०२४ ला नदीतील गाळ काढण्याच्या कामासाठी २ कोटी ८० लाख रुपये मंजूर झाले पावसाळ्याच्या तोंडावर काही दिवस काम झाले आणि त्यानंतर ३ मार्च २०२५ रोजी पुन्हा एकदा जगबुडी नदीतील गाळ काढण्याच्या कामाला जलसंपदा विभागामार्फत सुरवात झाली. कामाला सुरवात झाल्यानंतर नदीतील उपसलेला गाळ स्वखर्चाने वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. मात्र नदीतील उपसलेले गोटे वाळू आणि खडक नेण्यासाठी एकाही शेतकऱ्याने अजून प्रतिसाद दिलेला नाही. पावसाळा अवघा काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना तेवढ्या शिघ्रगतीने गाळ काढण्याच्या कामाला सुरवात होणे अपेक्षित आहे. मात्र दोन पोकलेन मशीनव्दारे नदीपात्रातच गाळ साचून ठेवला जात आहे. त्यातच आता दररोज येणारी भरती ओहोटी आणि नदीपात्रात साचून ठेवलेल्या गाळांच्या ढिगाऱ्यांवर नदीतील महाकाय मगरींनी कब्जा केल्याने गाळ काढण्याच्या कामात मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे. प्रशासन आता काय भूमिका घेते या लक्ष लागले आहे.