आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी सोमवारपासून मालमत्ता जप्तीसह पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. पाणीपट्टी भरण्याकडे कानाडोळा करणाऱ्या अठरा जणांची नळजोडणी पथकाने तोडली. या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वसुली मोहीम हाती घेतली होती. आतापर्यंत शहरातून २ लाख २० हजार रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे. चिपळूण पालिकेला मालमत्ता व पाणीपट्टी करातून थकीत व चालू वर्षाची मिळून १८ कोटी ३३ लाख ८१ हजार ५३७ रुपयांची वसुली अपेक्षित आहे. त्यापैकी आजपर्यंत ९ कोटी ५८ लाख ६५ हजार १०२ रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे अजून ४८ टक्के वसुली बाकी आहे. ही वसुली पूर्ण करण्यासाठी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी तथा कर वसुली अधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर आदी अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
३१ मार्च हे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी अंतिम मुदत आहे. शंभरटक्के कर वसुली व्हावी, अशा शासनाकडून सूचना दिल्या जात आहेत; मात्र आर्थिक वर्ष संपण्यासाठी महिनाभराचा कालावधीसुद्धा शिल्लक राहिलेला नाही. तरीही केवळ ५२ टक्के वसुलीच झाल्याने पालिका प्रशासनाने सोमवारपासून कारवाईची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी स्वतः मैदानात उतरत आपल्या टीमसह थकबाकीदारांच्या भेटी सुरू केल्या आहेत तर पालिकेची टीम घराच्या दारापर्यंत आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अनेकांनी कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कर व पाणीपट्टी भरली. यातून दिवसभर दोन लाख वीस हजार रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला. पाणीपट्टीची रक्कम भरण्याच्या वारंवार सूचना करूनही टाळाटाळ करणाऱ्या शहरातील १८ जणांना पाणी विभागाचे प्रमुख, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलाच दणका दिला. त्यांची नळजोडणी तोडून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. ही मोहीम ३१ मार्चपर्यंत अधिक तीव्र राबविण्यात येणार आहे.