तालुक्यातील मळेवाड परिसरातील एका गावामध्ये चिरेखाणीवर काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराच्या सहा वर्षाच्या मुलीचा डम्परच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून दबक्या आवाजात याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान हे प्रकरण दडपण्याच्या इराद्याने चिमुकलीचा मृतदेह तातडीने दफन करण्यात आला आणि तिच्या कुटुंबियांना गावी पाठविल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील मळेवाड़ परिसरातील एका गावातील चिरेखाणीवर परप्रांतीयकामगार काम करतात. याच परिसरात अनेक कुटुंबिय राहतात, त्यामुळे त्यांची मुलेही सोबत असतात.
यातीलच एक कुटुंबिय चिरेखाणीवर कामाला होते. त्यांची सहा वर्षाची मुलगीही त्यांच्यासोबत होती. काम चालू असताना ती डम्परच्या चाकाखाली आली आणि तिचा अपघाती मृत्यू झाला. याबाबत सर्वत्र दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरू आहे. घटना नेमकी केव्हा आणि कशी घडली याबाबत अद्यापही ठोस माहिती पुढे आलेली नाही. घटना कळताच चिरेखाणीचा मालक, संबंधित चालक यांनी कुठेही वाच्यता नकरता प्रकरण दडपण्याच्या इराद्याने या मुलीचे दफन केले. मात्र घटनालपून राहिली नाही. हा हा म्हणता ती गाव परिसरात पसरली आणि संतापाची लाट उसळली. मुलीच्या मृत्यूमुळे कारवाई होईल म्हणून परप्रांतीय कुटुंबियाला पैसे देवून गावी पाठविल्याची कुजबूज सुरू झाली.
ही बाब पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या कानावर आली. त्यांनी प्राथमिक चौकशी करुन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण म्हणाले की, त्या परिसरातील घटनेची चर्चा कानावर आली आणि आम्ही तपासाला लागलो. अज्ञाताविरोधात तातडीने गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मुलीच्या कुटुंबियांना बोलावून मृतदेह ज्या ठिकाणी दफन केला ती जागा शोधून पुढील तपास करण्यात येणार आहे. त्यानंतर रितसर तपास केला जाईल, असेही ते म्हणाले. रात्री उशीरा हाती आलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्याबाबत अर्ज दाखल केला होता. त्याला न्यायालयाने परवानगी दिली आहे. शुक्रवारी मृतदेह बाहेर काढण्यात येणार आहे.