दोन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कोकण भागाला मोठा फटका बसला आहे. आंबा, काजू व हंगामी पिकांचे नुकसान झाले असून, येथील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे कोकणातील बागायतदारांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस अजित यशवंतराव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. कोकणातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, याबाबतचे निवेदन नुकतेच अजित यशवंतराव यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना दिले. काही दिवसांपूर्वी मुंबई, कोकण भागांत अवकाळी पाऊस पडला. कोकण भागात जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने कोकणातील आंबा व काजू हे प्रामुख्याने पीक अडचणीत सापडले आहे.
आंबा व काजूला मोहोर व फळधारणा होत असतानाच अवकाळी पावसामुळे मोहोर व झालेली फळे गळून पडली आहेत. दिवसेंदिवस बदलत्या वातावरणाचा परिणाम या पिकांवर होत आहे. त्यामुळे कोकणातील आंबा-काजू शेतकरी अडचणीत आला आहे. दोन दिवस अवकाळी पडलेल्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस अजित यशवंतराव यांनी शासनाकडे कोकणातील शेतकऱ्यांची बाजू मांडली आहे. यशवंतराव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी हा फलोत्पादन जिल्हा म्हणून ओळखला जातो.
फळांचा राजा हापूस आंबा याचे उत्पादन घेण्यात रत्नागिरीचा वाटा मोठा आहे. २०२२-२३ या हंगामामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अहवालानुसार, हापूस आंब्याचे उत्पादन दहा ते पंधरा टक्के एव्हढेच झाले होते; मात्र यावर्षी २०२३- २४ च्या हंगामामध्ये आंबा व काजू पिकाला चांगला बहर येत असतानाच ८ व ९ जानेवारी २०२४ ला कोकणात अवकाळी पाऊस पडल्याने आंबा -काजू मोहोर पूर्णतः गळून पडला आहे. त्यामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यांसह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या आंबा व काजू पिकाला थ्रीप्स या किडीचा दरवर्षी सामना करावा लागत आहे. त्यामुळेही पिकांचे नुकसान होत आहे.