आंबा-काजू पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या राजापूर तालुक्यातील भू, खिणगिणी, कोतापूर, पेंडखळे या परिसरातील ३०० बागायतदारांना दिलासा मिळावा, असा प्रस्ताव जिल्हा कृषी विभागामार्फत शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या बागायतदारांना झालेल्या नुकसानीचा परतावा मिळेल, अशी आशा निर्माण झालेली आहे. तालुक्यातील भू परिसरातील शेतकऱ्यांनी बागायती विकसित केलेल्या आहेत. दरवर्षी या बागायतदारांना हंगामातील प्रतिकूल हवामानाचा फटका बसतो. दरवर्षीप्रमाणे २०२३-२४ या कालावधीमध्येही बागायतदारांना प्रतिकूल हवामान, अवकाळी पाऊस याचा चांगलाच फटका बसून नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. गतवर्षीच्या हंगामात प्रतिकूल हवामानामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. त्याचा फटका भू परिसरातील अडीचशे ते तीनशे बागायतदारांना बसला. या शेतकऱ्यांनी शासनाच्या पीकविमा योजनेंतर्गत विमा उतरवलेला होता.
झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावर जिल्हा कृषी विभागाकडून तातडीने दखल घेण्यात आलेली आहे. भू परिसरातील बागायतदारांचा विमा भरपाईसाठी विचार करावा, असे पत्र कृषी विभागाकडून कृषी संचालक कार्यालयाला दिले आहे. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर जिल्हा तक्रार निवारण समितीपुढे हा विषय मांडला जाईल. त्याची चौकशी झाल्यानंतर भरपाई देण्याबाबत कार्यवाही होईल. दरम्यान, भू मंडळातील बागायतदार यापूर्वी अशाच पद्धतीने परताव्यापासून वंचित राहिलेले होते. त्यांना लाभ मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
मंडळ बदलाचा प्रस्ताव – भू महसूल मंडळ गोवळ किंवा राजापूर मंडळाशी जोडलेले होते; मात्र शेतकऱ्यांशी चर्चा न करताच ते केंद्र लांजा तालुक्यातील हर्चे या हवामानमापक केंद्राला जोडण्यात आले होते. त्याचा फटका यंदा विमा भरपाईला बसल्याचे स्थानिक बागायतदारांचे म्हणणे आहे. याबाबत कृषी विभागानेही तातडीने भू मंडळ पूर्वीप्रमाणे गोवळ किंवा राजापूर मंडळाशी जोडण्याबाबतच प्रस्तावही तयार केला आहे.