दोन शिवसेनेत प्रमुख लढत होत असलेल्या कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघात शिंदे की ठाकरेंची शिवसेना बाजी मारते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. गत तीन निवडणुकांचा विचार करता येथील स्पर्धा नाईक विरुद्ध राणे अशी पारंपरिक असली तरी राजकीय गणिते मात्र बदलली आहेत. त्यामुळे येथील लढत अधिक चुरशीची होणार आहे. विधानसभा मतदारसंघांची २००९ मध्ये पुनर्रचना करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील एक मतदारसंघ कमी करून तीन विधानसभा करण्यात आल्या. या नव्या रचनेत कुडाळ-मालवण असा नवीन मतदारसंघ तयार झाला. पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ मध्ये याच नाईक यांनी नारायण राणे यांचा धक्कादायक पराभव करीत रोमहर्षक विजय मिळविला. त्यानंतर झालेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राणे समर्थक रणजित देसाई यांचाही नाईक यांनी पराभव केला. आता ते विजयाच्या हॅट्रिकसाठी निवडणूक रिंगणात आहेत.
मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच २००९ च्या निवडणुकीत राणे यांनी २४ हजार २५५ मतांनी नाईक यांचा पराभव केला होता. त्यावेळी नारायण राणे राज्यात मंत्री होते. तसेच राज्यात पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादीचीच सत्ता येण्याची चिन्हे होती. त्यामुळे या निवडणुकीत राणेंचा सहज विजय झाला. त्यावेळी सिंधुदुर्गात राणेंचे वर्चस्व होते; मात्र त्या मानाने वैभव नाईक नवखे होते, तरीही नाईक यांनी दिलेली लढत लक्षवेधी होती. राणे यांना भविष्यात धोका असल्याचा इशारा देणारी लढत होती. याआधी २००५ मध्ये शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत राणे काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे शिवसेना विजयी होण्यापेक्षा किती मते या मतदारसंघात घेते, याकडे राज्याचे लक्ष होते. या परीक्षेत आमदार होता आले नसले, तरी वैभव नाईक उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर झालेल्या २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा नारायण राणे विरुद्ध वैभव नाईक अशी प्रमुख लढत झाली. या निवडणुकीपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात ‘मोदी लाट’ होती.
तिचा १०० टक्के प्रभाव विधानसभा निवडणुकीत टिकून होता. त्यामुळे ही निवडणूक पुन्हा राणे विरुद्ध शिवसेना अशीच पारंपरिक झाली. या निवडणुकीत १० हजार ३७६ मताधिक्याने वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा धक्कादायक पराभव केला. राणे यांच्या या पराभवाला त्यांची राजकीय दहशत, प्रकल्पाच्या नावाखाली जमिनी घेणारे, अशा आशयाची टीका विरोधकांनी केली. त्याचवेळी ‘मोदी लाट’ ही वैभव नाईक यांना पोषक ठरली होती. ‘सी-वर्ल्ड’ प्रकल्प आणि पारंपरिक विरुद्ध ‘पर्ससीन मासेमारी’ हा वादही राणे यांना भोवला होता. या सर्वांचा परिपाक म्हणून राणे यांना प्रथमच पराभवाची चव चाखावी लागली होती. २०१९ च्या निवडणुकीत थेट राणे विरुद्ध शिवसेना, अशी लढत झाली नाही; परंतु शिवसेनेचे नाईक यांच्या विरुद्ध राणे समर्थक देसाई यांच्यात प्रमुख लढत झाली. यावेळी नाईक यांनी १४ हजार ३१९ एवढे मताधिक्य घेतले होते. या निवडणुकीपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत विरुद्ध राणे यांचे पुत्र नीलेश यांच्यात प्रमुख लढत झाली होती.
त्यावेळी विजयी झालेल्या शिवसेनेच्या राऊत यांना कुडाळ-मालवण मतदारसंघातून दहा हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे २०१९ची विधानसभा निवडणूक नाईक यांना सहज सोपी नव्हती. त्यामुळे नाईक यांनी त्यावेळी राणे यांचे समर्थक फोडण्याचा धडाका लावला होता. विशेषतः मालवण तालुक्यातून खासदार राऊत यांना कमी मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे त्यांनी मालवण तालुक्यावर फोकस केला होता. नाईक यांनी राणे यांच्या तत्कालीन स्वाभिमानी पक्षाचे मालवण तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्यासह यतिन खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक अशा चार नगरसेवकांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश करून घेतला. तसेच छोटू ठाकूर यांच्यासारखे पंचायत समितीचे नेतृत्व करणारे राणे यांचे ग्रामीण भागातील मोहरे हेरत त्यांचाही प्रवेश करून घेतला होता. थेट जनतेतून निवडून आलेले अनेक सरपंच पक्षात घेतले होते. याशिवाय राणे यांच्याकडून उमेदवार निवड करण्यास उशीर झाला.
प्रथम दत्ता सामंत यांना उमेदवारी जाहीर केली गेली, त्यांचा अर्ज बाद ठरल्यामुळे डमी अर्ज भरलेल्या रणजित देसाई यांना नाईक यांच्या विरोधात रिंगणात उतरले गेले. राणे यांचे समर्थक असलेल्या देसाई यांना भाजपचे कमळ चिन्ह मिळू शकले नव्हते. ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होते. देसाई हे भाजप पुरस्कृत असले तरी मूळ भाजपने त्यांना स्वीकारले नव्हते. मूळ भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी युतीधर्म पाळत वैभव नाईक यांना पाठिंबा देत मतदान केले होते. अशा स्थितीत देसाई यांना ५४ हजार ८१९ मते मिळवून दिली होती, तर नाईक यांना ६९ हजार १६८ मते मिळाली होती.
नाईक आव्हान भेदणार का ? – २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा नाईक विरुद्ध नीलेश राणे अशी प्रमुख लढत होत आहे; मात्र या वेळी राजकीय गणिते वेगळी आहेत. लोकसभेत या मतदारसंघाने राणेंना मोठे मताधिक्य दिले आहे. नाईक यांच्यासाठी हा बॅकलॉग भरून काढावा लागणार आहे. यावेळी राणे कुटुंबातील सदस्य उमेदवार आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये ज्या शिवसेना पक्ष, नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावर नाईक निवडून आले, ते चिन्ह आणि पक्ष यावेळी नीलेश राणेंकडे आहे. हे आव्हान भेदण्यात नाईक किती यशस्वी होतात, त्यावर त्यांची विजयाची हॅट्ट्रिक अवलंबून आहे.