रत्नागिरीतील गायींगुरे व वासरे रस्त्यावर बेवारस फिरतात. त्यामुळे होणारे विविध अपघात, प्लास्टिक पोटात गेल्याने गायी गुरांचा होणारा मृत्यू यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सोमेश्वर येथे शशिकांत सोहनी यांनी सोमेश्वर शांतीपीठाला दान केलेल्या पाच एकर जागेमध्ये पण ट्रस्टमार्फत, अशा बेवारस व भटक्या गायीगुरांची व्यवस्था करण्याचे ठरविले आहे. भारताचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर येथे गोशाळा उभारणीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. रत्नागिरी शहर व परिसरातील भटकी, मोकाट व शेतकऱ्यांनी सोडलेल्या गुरांचे संगोपन करण्याचे काम सोमेश्वर शांतीपीठाची गोशाळा करणार आहे.
गोशाळेच्या माध्यमातून विविध गोमय उत्पादनांची व्यवस्था येथे केली जाणार आहे. गावातील ३६ महिला बचत गट या उपक्रमाला जोडले जाणार आहे. आजूबाजूच्या गावांमध्ये गोविज्ञान केंद्रामार्फत संस्कार वर्गाचे आयोजन केले जाणार आहे. गोवंशाचे रक्षण गोआधारित कृषी व्यवस्था कृषी आधारित अर्थनिती, गोआधारित स्वास्थ्यनीती व ऊर्जानिती या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा ट्रस्टचा विचार आहे. तालुक्यातील सोमेश्वर येथे विश्वमंगल गोशाळा व गोविज्ञान केंद्रातर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. गोशाळा उभारणीसाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिले.
तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनीदेखील गोशाळा उभारणीसाठी पंधरा लाखांची मदत करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी स्पष्ट केले. जिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले, रत्नागिरी म्हणजे नररत्नांची खाण आहे. रत्नदुर्गाच्या कुशीत वसलेली आपली टुमदार रत्नागिरी. जगभरातल्या पर्यटकांना भुरळ पडते ती इथल्या निसर्गदत्त हिरवळीची. मांडवी, भाट्याच्या समुद्रकिनाऱ्याची आणि टिळक, सावरकर यांच्या पदस्पर्शान पावन झालेल्या येथील वास्तुंची. सोमेश्वर हे गावसुद्धा निसर्गसंपन्न आहे. सोमेश्वर येथील भराडीन देवीच्या मंदिरात हा छोटेखानी कार्यक्रम झाला. मंदिर आणि गोमाता यांचे अतुट नाते आहे.
मंदिराच्या माध्यमातून आपण हिंदू परंपरेचे जतन करतो. वस्तुस्थिती मात्र फार भयावह दिसते. या वेळी सोमेश्वरातील ग्रामस्थ, तालुकाध्यक्ष दादा दळी, जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, भाजप शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, संतोष बोरकर, संकेत कदम, डॉ. ऋषिकेश केळकर, छाया अनवकर, श्री व्यारणामानी प्रजापती मरूधर विष्णू समाजाचे अध्यक्ष गोरक्षप्रमुख रमेश कुमार, कांतीलाल प्रजापती, दिनेश मालवीय, अशोक पाटील, विनोद पेटकर, अनुजा पेटकर, विराज पंडित, कृष्णा पाटील, अनुरंग घाणेकर, राजेश वाघ, नीलेश आखाडे, श्री. झापडेकर, सौ. सोहनी, अनिरुद्ध फळणीकर, देवेंद्र झापडेकर, सोमेश्वर व चिंचखरी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.