कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात शेती, आंबा आणि मासेमारी हे पारंपारिक उद्योग आहेत. काळानुसार होत असलेल्या बदलाला देखील येथील शेतकरी आणि व्यावसायिकांनी मान्य केले आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे जास्त कल दिसून येत आहे.
कृषी मंत्रालयाने आता शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याला मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात केवळ प्रायोगिक तत्त्वावर कीटकनाशकांच्या फवारणीसाठी ही मान्यता देण्यात आली आहे. कोकणात आंबा फवारणीसाठी हे तंत्र वापरण्यासाठी बागायतदारांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
शेतकरी आता शेती कामांमध्ये ड्रोनचा वापर करू शकतात. यासाठी काही अटी, शर्तीवर ही मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता केवळ किटकनाशके फवारणीसाठी देण्यात आली आहे. त्यातही ४७७ प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
कोकणामध्ये आंबा फवारणीसाठी ड्रोनद्वारे फवारणी करण्याचे तंत्रज्ञान वापरण्यासाठी बागायतदारांना विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी कोकणातील शेतकर्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाने लवकरच आयोजित करण्यात येणार्या आंबा महोत्सवात या तंत्रांचे प्रात्यक्षिक देण्याची तयारी केली आहे.
काही प्रभावी आणि सुरक्षित असे नियम पाळून शेतकर्यांना शेतात ड्रोनद्वारे फवारणी करता येणार आहे. याचा नेमका अभ्यास करून कोणकोणत्या कामासाठी शेतीमध्ये ड्रोनचा वापर करता येईल, त्यानुसार पुढच्या टप्प्यात परवानगी देण्यात येणार आहे. यामध्ये पीक फवारणी क्षेत्र, वजनाची मर्यादा, नोंदणी आणि सुरक्षा विमा व त्यासोबत हंगामी परिस्थितीचा उल्लेख याचा समावेश नियमावली तयार करताना करण्यात आला आहे. ड्रोनच्या वापरामध्ये अगदी ड्रोन उडवण्यापासून ते खाली उतरवताना कोणत्या प्रकारची विशेष काळजी घ्यावी लागते, याबद्दल नियमावली ठरवण्यात आली आहे.