28.6 C
Ratnagiri
Friday, December 27, 2024
HomeRatnagiriशासन आपल्या दारी, विद्यार्थी फिरताहेत दारोदारी - ठाकरे गट आक्रमक

शासन आपल्या दारी, विद्यार्थी फिरताहेत दारोदारी – ठाकरे गट आक्रमक

रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील शून्य शिक्षिकी शाळांविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सोमवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जाब विचारला. ‘शासन आपल्या दारी आणि विद्यार्थी फिरताहेत दारोदारी’ असा कारभार सुरू असल्याचा आरोप यावेळी ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप तथा बंड्याशेठ साळवी यांनी केला. सोमवारी शिवसेनेचा ५७ वा वर्धापनदिन होता. यानिमित्ताने ठाकरे गटाच्यावतीने रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरी मंदिरात काही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली. रत्नागिरी तालुकाप्रमुख माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी यांच्या नेतृत्वाखालील आक्रमक झालेले शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांच्या कार्यालयात धाव घेतली.

रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघात १४ शाळा शून्य शिक्षिकी आहेत. मुले शाळेत येतात. मात्र शिकवायला गुरूजी नाहीत. या शाळांवर शिक्षक कधी नेमताय? असा सवाल या नेत्यांनी केला. शिक्षक नेमणार नसाल तर शाळांना कुलुप ठोका अंशा संतप्त स्वरात सांगण्यात आले. येत्या आठवडाभरात या शाळांवर शिक्षक नेम ले नाहीत तर आम्हीच शाळांना कुलुप ठोकू आणि पालकांसह विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या कार्यालयात आणून बसवू, असा रोखठोक इशारा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सीईओंना दिला. ही अवस्था म्हणजे ‘शासन आपल्या दारी आणि विद्यार्थी फिरताहेत दारोदारी’ असे असल्याची टीका बंड्याशेठ साळवी यांनी केली.

यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे मोर्चा वळवला. त्यांनाही धारेवर धरले. शाळांची स्थिती आपणाला माहिती आहे का? कधी शाळांमध्ये गेला आहात का? असे अनेक सवाल विचारण्यात आले. विभागप्रमुख महेंद्र झापडेकर यांनी आकडेवारी सादर करत जाब विचारला. ज्या शाळांमध्ये ६५ ते ७० विद्यार्थी आहेत तेथील शिक्षकांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करण्यात आल्या आणि जेथे ८ ते ९ विद्यार्थी आहेत तेथील शिक्षकांच्या बदल्या करून त्यांना कार्यमुक्त करण्याची काय घाई होती? असा सवाल त्यांनी केला. शिक्षक कमी असताना बदली झालेल्या शिक्षकांना सोडलेतच का? असा सवाल संदीप सुर्वे यांनी केला. शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी शून्य शिक्षिकी शाळांमध्ये येत्या आठवडाभरात शिक्षक देण्यात येतील असे आश्वासन दिले, अशी माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली.

सरपंचांना विश्वासात का घेत नाही? – याचवेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सरपंचांना विश्वासात न घेता होत असलेल्या कामांबाबतही आक्रमक पवित्रा घेतला. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायतीचे सरपंच हे जनतेतून निवडून आले आहेत. त्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायत कार्यालयांत परस्पर जि.प. अभियंता येतात, कामे सुचवतात, संमत्तीपत्रे. नसताना कामे सुरू केली जातात हा काय प्रकार आहे असा जाब प्रदीप तथा बंड्याशेठ साळवी यांनी केला. यावेळी जि.प. कार्यकारी अभियंता पाटील यांनी अधिकाऱ्यांना सरपंचांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापुढे असे घडणार नाही अशी माहिती दिली.

ठाकरे गट आक्रमक – जिल्हा परिषदेवर तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक होत धडकले. त्यामध्ये ज्येष्ठ नेते प्रमोद शेरे, जि.प.चे माजी अध्यक्ष जयसिंग घोसाळे, उदय बने, माजी सभापती परशुराम कदम, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप सुर्वे, फणसोपच्या सरपंच राधिका साळवी, महिला आघाडीच्या नेत्या द्राक्षायणी शिगवण, माजी नगरसेविका रशिदा गोदड, सौ. शिवलकर, विभागप्रमुख राकेश साळवी, महेंद्र झापडेकर, रत्नागिरी उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे, विभागप्रमुख विजय देसाई, संजय साळवी आदींसह तालुक्यातील ‘काही सरपंच उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular