26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeKhedपावसाळ्यात परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या भितीने यावर्षीही पेढेवासियांचा जीव टांगणीलाच

पावसाळ्यात परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या भितीने यावर्षीही पेढेवासियांचा जीव टांगणीलाच

पावसाळ्यात मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने घडतात. दोन वर्षापूर्वी दरड कोसळून त्यात पेढेतील काही जणांना हकनाक बळी गेला होता, तर दोन दिवसापूर्वीही डोंगरातील भली मोठी दगड एका खाजगी बस समोर कोसळण्याचा प्रकार घडला होता. सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम घाटात सुरू असून अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात येथील रस्त्यालगत करण्यात आलेल्या भरावाची माती पायथ्यालगत वसलेल्या पेढे येथील लोकवस्तीत वाहून जाऊ नये व कोणती दुर्घटना घडू नये, यासाठी त्यावर प्लास्टिक अंथरण्यात आले आहे. मात्र हे प्लास्टिक मुसळधार पावसात किती टिकेल, याची साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यावर्षीही पेढेवासियांचा जीव टांगणीला लागला असून ग्रामस्थांमधून या कारभारा विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

घाटात काँक्रिटीकरणाने चौपदरीकरणाच्या एका लेनचे काम पूर्ण झाले असून वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. चिपळूण टप्प्यात दोन लेनचे काम पूर्णत्वास गेले आहे. मध्यंतरी खेड टप्प्यातील कंत्राटदार कंपनी परशुराम हायवे प्रा. ली. यांच्या मागणीनुसार घाटातील वाहतूक पंधरा दिवस बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, पावसाला सुरूवात झाली आहे. घाटातील चौपदरीकरणात एक लेन पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस खुली करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये केवळ शंभर मीटरचे काम शिल्लक राहिले आहे. येत्या दोन दिवसात शिल्लक रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. ते काम पूर्ण झाल्यास घाटातील पूर्ण एक लेनवरून वाहतूक सुरू होणार आहे.

परशुराम घाटात बहुतांशी ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यात आलेल्या आहेत. चिपळूण टप्प्यातील संरक्षक भिंतींची कामे पूर्णत्वास गेली असली, तरी खेड टप्प्यातील कामे शिल्लक आहेत. त्यामुळे तेथे पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनीही चिपळूण दौऱ्यात घाटाच्या पाहाणीवेळी पावसाळ्यात दरडी कोसळू शकतात, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. घाटाच्या वरच्या बाजूला बांधलेली भिंत आणि रस्ता यामध्ये असलेल्या भागाला दगडीने पिचिंग करण्याचे काम शिल्लक राहिलेले आहे.

सध्या सुरू झालेल्या पावसाळ्यामुळे ते आता होणे अशक्य असल्याने पावसाच्या पाण्याने माती वाहून जाऊ नये म्हणून चक्क विस्तीर्ण असे प्लास्टिक कापड या डोंगरात मातीवर अंथरण्यात आलेले आहे. मात्र मुसळधार पावसात हे प्लास्टिक कितपत टिकून राहील, याची खात्री कोणीही देताना दिसत नाही. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यातही घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेढेवासियांना आपला जीव मुठीत घेऊनही राहावे लागणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular