रत्नागिरी पालिका निवडणुकीमध्ये कायमच चर्चेचा विषय ठरली आहे. येथील राजकीय स्थिती प्रत्येक वेळी वेगळी राजकीय घडामोड घडवणारी असते. वास्तविक, या पालिकेवर वर्षानुवर्षे शिवसेनेचे वर्चस्व आहे; परंतु माजी नगराध्यक्ष दिवंगत उमेश शेट्ये यांनी ‘वन टू का फोर’ करत सत्ता काबीज केली होती. त्यानंतर मात्र शिवसेनेचा आणि अर्थात महायुतीचा पालिकेवर कायम वरचष्मा राहिला आहे. गेली तीन वर्षे पालिकेवर प्रशासक असल्याने आणि विचित्र राजकीय परिस्थितीने रत्नागिरी पालिकेचे राजकारण वेगळ्या वळणावर आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानेही राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. राज्य आणि केंद्रात असलेली भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती म्हणूनच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याच्या मानसिकतेत आहेत. शिवसेनेचे विभाजन झाल्यामुळे शहरातदेखील मतदारांची विभागणी होणार आहे. पालकमंत्री सामंत यांनी सत्तेचा पुरेपूर फायदा घेत शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे आणली.
एवढा विकास करूनही त्यांना विधानसभा निवडणुकीत शहरातून अपेक्षित मतदान झाले नाही. रत्नागिरी पालिकेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होणार नाही, हे यातून स्पष्ट झाले. राजकारणाची बदललेली परिसीमा यातून दिसत आहे. आता विकासावर नाही, तर व्यक्तिगत जनसंपर्क, लोकांची तत्परतेने केलेली कामे, त्याला जोड विकासकामे आदी मुद्द्यावर राजकारण चालू लागले आहे. उदय सामंत यांनी शहराचा अभ्यास करून पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना निधी देत प्रभाग मजबूत केले आहेत. भाजपचीदेखील तीच स्थिती आहे. भाजप-शिवसेना अगदी सूक्ष्म नियोजन करून या निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे महायुती झाली तर भाजप, शिवसेनेला ही निवडणूक फलदायी ठरणार आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीचा विचार केला तर रत्नागिरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे; परंतु काँग्रेस आपली ताकद निर्माण करण्यास कमी पडत आहे. शिवसेना फुटल्यामुळे शहरातील तिची ताकद कमी झाली आहे.
राष्ट्रवादीची देखील तीच परिस्थिती आहे. त्यात सत्तेत नसल्याने गेल्या तीन वर्षांमध्ये महाविकास आघाडी जनतेच्या किती संपर्कात आहे, हा प्रश्न आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांचे मात्र ठाकरे गटाची मरगळ झटकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत; परंतु नगराध्यक्षपदाचा मोठा तिढा नाराजीचे कारण ठरणारा आहे. बाळ माने हे आपली सून शिवानी माने हिला नगराध्यक्षाच्या लढतीत उरवणार आहेत, तर राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर देखील आपल्या पत्नीला उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे आहेत.
मुस्लिम समाजातील गैरसमज दूर करण्यास यश – उदय सामंत यांनी गेल्या काही महिन्यांपासून शहरात विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यांनी कोट्यवधींची विकासकामे केली आहेत. त्याचा फायदा मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. मुस्लिम समाजाचा कलदेखील त्यांनी बदलण्याच्यादृष्टीने चांगले प्रयत्न केले आहेत. लोकसभा, विधानसभेला जो ‘फेक नरेटिव्ह’ होता, तो आता बदलून मुस्लिम समाज शिवेसनेच्या मागे राहील, अशी त्यांची अपेक्षा आहे.

