आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती जागा लढवायच्या, याबाबत वरिष्ठ तीन नेते निर्णय घेतील; पण कोकणातल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ३ जिल्ह्यांमधील १५ जागा आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढणार आणि १०० टक्के निवडून येतील, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. रत्नागिरीत सुशोभीकरणाच्या रेल्वेस्थानक लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मंत्री सामंत पत्रकारांशी बोलत होते. सामंत म्हणाले, विधानसभा तिकीट वाटपाबाबत आम्ही निर्णय घेण्यापेक्षा महायुतीतील वरिष्ठ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील आणि सकारात्मक तोडगा काढतील. हरियानाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील स्थिती आगामी विधानसभेवेळी असेल, असेही सांगितले.
हरियानाच्या निकालावर काँग्रेसच्या नेत्यांनी टीका करण्यासाठी कागदच्या कागद लिहून ठेवले होते; पण ते त्यांना तेथे लागलेल्या निकालाने साध्य झालेले नाही. राज्यातील महायुती सरकारबाबत काँग्रेसवाल्यांनी काहीही बदनामी केली तरी आमचं सरकार विधानसभा निवडणुकीत बाजी मारणार असल्याचा पुनरुच्चार सामंत यांनी केला. अरबी समुद्रातील शिवस्मारक विषयात काँग्रेसच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. शिवाजी महाराजांचा वारसा जपणारी महायुती आहे.
त्यामुळे केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये काँग्रेस सरकार होते, त्यावेळी स्मारक का नाही झालं? त्यावेळी त्यांनी स्मारक का नाही केलं? स्वतः काही करायचं नाही आणि महायुतीच्या नेत्यांवरती टीका करायची ही प्रथा बनली आहे. महायुतीवरती टीका करायची हा काँग्रेसवाल्यांचा धंदा बनला आहे, असेही ते म्हणाले.
कुंदनच्या कुटुंबीयांना ऊर्जामंत्री न्याय देतील – रत्नागिरी महावितरणमध्ये काम करणारा फणसवळेतील कुंदन शिंदे या तरुणाच्या मृत्यू प्रकरणावरून महावितरण व ठेकेदाराच्या हलगर्जी कारभारावरून मंगळवारी मोठा उद्रेक झाला होता. यावर सामंत म्हणाले, शिंदे या तरुणावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती मिळाळी. आपण त्याच्या नातेवाइकांशी संवाद साधला. रुग्णालयात उद्रेक संबंधित ठेकदार या घटनेनंतर उपस्थित न राहिल्याने झाला. तो उद्रेक जनसामान्यांचा होता. ठेकेदाराने आगाऊपणा करू नये. आपण स्वतः महावितरणच्या सीईओंशीदेखील बोललो आहोत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली. तरुणाच्या कुटुंबीयांना फडणवीस नक्की न्याय देतील, असे सामंत यांनी सांगितले.