जीएसटी दर कमी झाल्याने घराच्या आसपासच्या किराणा दुकानात टूथब्रशपासून ते ब्रँडेड गावरान तुपापर्यंतच्या असंख्य वस्तू खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांच्या पदरी निराशा पडत आहे. कारण, किराणा व्यापारी जुन्या किमतीतच वस्तू विकत आहेत. यामुळे काही ठिकाणी ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये वाद सुरू झाले आहेत; मात्र वितरक, सुपर शॉपींनी त्यांच्याकडील जुन्या वस्तूही कमी झालेल्या किमतीत विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्राहकांना किंचित समाधान मिळाले. किराणा दुकानातील ब्रँडेड ५४ वस्तूंवरील जीएसटी ५ टक्के तर कुठे शून्य टक्के करण्यात आला. मात्र, याचा फायदा अनेक ठिकाणी ग्राहकांना मिळत नाही. आम्ही जास्त दरातील जीएसटी भरून माल खरेदी केला आहे. यामुळे आम्ही त्याच किमतीत माल विकणार. नवीन उत्पादनात
कंपन्या कमी एमआरपी करतील, तो माल आल्यावर आम्ही नवीन दरात विकू, असे दुकानदार ग्राहकांना सांगत आहेत. जेव्हा भाव वाढतात तेव्हा तुम्ही लगेच किमती वाढवतात, आता भाव कमी झाल्यावर किमती कमी का करत नाही, असा सवाल ग्राहक व्यापाऱ्यांना विचारत आहेत; मात्र, किराणा वगळता औषधी, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व वाहनांच्या किमती कमी झाल्या. काही विक्रेते जुनी व नवीन किमतीची यादी समोर ठेवत आहेत.