महायुतीमध्ये राज्यातील ८० ते ८५ टक्के जागावाटप निश्चित झाल्या आहेत. उर्वरित जागांबाबत भौगोलिक स्थितीचा विचार करून महायुतीचे नेते मंडळी निर्णय घेऊन लवकरच उमेदवारांची घोषणा होईल, असे शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. गुहागर विधानसभेवर शिवसेनेने दावा केला आहे, त्यामुळे या जागेचा निर्णय प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले. शासकी विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, महायुतीमध्ये समन्वय असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे. महाविकास आघाडीमध्ये सध्या मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांबाबत फॉर्म्युला सांगून, बाशिंग बांधून असलेल्यांना गप्प बसवले असल्याची टीकाही त्यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत तीन पक्षांच्या नेत्यांनी समन्वय राखत जागा वाटपाबाबत निर्णय घेत आहेत. ८० ते ८५ टक्के जागा वाटपाचा निर्णय झाला आहे. काही इच्छुक मंडळी तिकीट मिळणार नसल्याने पलीकडे जात आहेत. कोणी गेल्यावर महायुतीला काही फरक पडणार नाही. ज्या जागांबाबत निर्णय झालेला नाही, त्यासाठी तेथील परिस्थितीचा विचार तीनही पक्षांचे नेतेमंडळी करतील आणि त्यावर तोडगा काढतील.
माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेतून लढावे की, भाजपमधून याबाबतचा निर्णय भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. रत्नागिरीवर भाजपाचे पदाधिकारी दावा करीत असल्या बाबत ते म्हणाले की, प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे. मात्र, याबाबतचा निर्णय जिल्हा पातळीवर नाही, तर राज्यातील नेतेमंडळी घेतील, माझ्याबाबत जो निर्णय वरिष्ठ घेतील तो मला मान्य असेल असेही सामंतांनी त्यांनी स्पष्ट केले.