रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून मी सलग चार वेळा निवडून आलो आहे. मला सातत्याने निवडून येण्याची सवय आहे तर काहींना सतत पराभूत होण्याची सवय आहे. येत्या निवडणुकीतही पुन्हा तेच घडलेले असेल, अशी टोलेबाजी महायुतीचे रत्नागिरीतील उमेदवार ना. उदय सामंत यांनी केली. महायुतीची प्रचार सभा स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. नाचणे जिल्हा परिषद गटासाठी ही प्रचार सभा पार पडली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दादा दळी, शिवसेनेचे बाबू म्हाप, जयसिंग घोसाळे, भैया भोंगले, प्रकाश रसाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. नाचणे गटासाठी आपण सर्वाधिक विकास कामे आणली आहेत. एमआयडीसीच्या माध्यमातून. मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीला ८.५ कोटींचा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे, २४ तास पाण्याची सुविधा विविध योजनांचा महिलांसह इतरांना लाभ उपलब्ध करून देण्यात आला आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आपल्याला ‘सव्वा लाख मते मिळतील.
मतदार यादीत माझे पहिल्या क्रमांकावर नाव आहे आणि पहिल्या क्रमांकावर आपण राहणार आहोत, असा विश्वास ना. सामंत यांनी व्यक्त केला. गेले तीन महिने रत्नागिरीत घाणेरडे राजकारण सुरू होते. या घाणेरड्या राजकारणाचा सूत्रधार कोण होता, हे आता समोर आले आहे. मात्र आपण त्याचा फारसा विचार करत नाही. आपल्या मतदारसंघात आणि राज्यात उद्योग आले पाहिजेत त्यासाठी आपण तत्कालीन उद्योग मंत्र्यांकडे सातत्याने जायचो. मात्र तेव्हा प्रतिसाद मिळाला नव्हता. जेव्हा मी स्वतः मंत्री झालो त्यावेळी जास्तीत जास्त उद्योग आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न केले आहेत, असेही सामंत यावेळी म्हणाले.