23.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरत्नागिरीत काँग्रेसच्या महिलांचा हंडा-कळशी मोर्चा - 'शासन आपल्या दारी.. पण घरात नाही पाणी'

रत्नागिरीत काँग्रेसच्या महिलांचा हंडा-कळशी मोर्चा – ‘शासन आपल्या दारी.. पण घरात नाही पाणी’

‘शासन आपल्या दारी, घरात नाही पाणी’, नगर परिषद हाय हाय’ अशा गगनभेदी घोषणा देत रत्नागिरीत काँग्रेसच्यावतीने हंडा-कळशी मोर्चा काढण्यात आला. मुख्याधिकाप्यांच्या केबीन बाहेर ठिय्या मांडून अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले. शहरात सध्या पाण्याची अवस्था बिकट होत चालली आहे. पाण्याचे स्त्रोत आटत असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ व पानवल धरणाची पाण्याची पातळी देखील कमी होत आहे. त्यातच पानवल धरण हे पूर्णत: बंद झाले असून शहराची तहान आता शीळ धरणावर अवलंबून आहे. त्यातच वाढता उष्मा आणि आटत चाललेले पाण्याचे स्त्रोत डोळ्यासमोर ठेवून नगर परिषदेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. मात्र एक दिवसाआड मिळणारे पाणी हेदेखील मुबलक मिळत नसल्याने काँग्रेसच्यावतीने पाण्यासाठी ‘हंडा कळशी मोर्चाचे आयोजन सोमवारी करण्यात आले. काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अॅड. अश्विनी आगाशे, राज्याच्या सरचिटणीस रुपाली सावंत. सुष्मिता सुर्वे यांच्यासह दिपक राऊत, कपिल नागवेकर, साजिद पावसकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

हंडा-कळशा घेऊन आल्या –  या मोर्चात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. सर्व महिलांनी डोकीवर हंडा कळशा घेऊन निदर्शने केली. मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांचा रोष कमालीचा वाढला होता. यावेळी महिलांनी नगर परिषदेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आधी पाणी द्या आणि मग दारी या – शासन आपल्या दारी या शासनाच्या ब्रीदवाक्यावर संतप्त महिलानी घोषणा दिल्या. ‘शासन आपल्या दारी मात्र आमच्या घरात नाही पाणी’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आधी आम्हाला पाणी द्या, मग दारी या अशा प्रतिक्रिया महिलांनी यावेळी व्यक्त केल्या.

ठिय्या मांडला – जोपर्यंत पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मागे हटायचे नाही असा निर्णय घेत मोर्चेकऱ्यांनी थेट नगर परिषदेमध्ये जावून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी सारी नगरपरिषद दणाणून गेली. दालनाबाहेर आंदोलक ठिय्या मांडून होते आणि दालनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पाणी विभागाचे कर्मचारी मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्षा करीत बसले होते.

मुख्याधिकाऱ्यांचे आगमन – दालनाबाहेर आंदोलकांनी ठिय्या मांडलेला असतानाच मुख्याधिकारी तुषार बाबर यांचे आगमन झाले. ते थेट आपल्या दालनात निघून गेले. ५ जणांच्या शिष्टमंडळाला त्यांनी आत येण्याची विनंती केली मात्र तुम्हीच बाहेर या असा निरोप आंदोलकांनी दिल्याने मुख्याधिकारी चर्चा करण्यासाठी दालनाबाहेर आले.

जाब विचारला – यावेळी संतप्त महिलांनी मुख्याधिकाऱ्यांना पाणी पुरवठ्यावरुन जाब विचारला. करोडो रुपयांची योजना राबवली मात्र २४ तास सोडा १ तास देखील आपण मुबलक पाणी देऊ शकत नाही मग या योजना काय कामाच्या? असा सवाल संतप्त महिलांनी उपस्थित केला.

हे धरण की डबके ? – काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अॅड. अश्विनी आगाशे यांनी धरणांची पाहणी करुन त्याचे फोटो मुख्याधिकाऱ्यांना दाखवले. शीळ धरण हे पूर्ण आटलेले असून या धरणाला आता डबक्याचे स्वरुप आले आहे. यावरुन हे धरण आहे की डबके असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

घरपट्टी घेता पाणी देणार कोण? – आमच्याकडून लाखो रुपयांच्या घरपट्ट्या वसुल करता मग पाण्याचा प्रश्न सोडवणार कोण? असा सवाल करीत निकृष्ट दर्जाची नळपाणी योजना कोणाच्या चुकीमुळे राबवण्यात आली? असा सवाल यावेळी करण्यात आला. ज्यांच्या चुकीमुळे ही निकृष्ट दर्जाची नळपाणी योजना राबवली गेली त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.

विहीरीतील गाळ काढा – शहरात काही ठिकाणी सार्वजनिक विहीरी आहेत. या विहीरींची अवस्था पानवळ धरणाहून बिकट बनली आहे. दारात पाणी असून देखील पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. त्यातच विहीरीजवळ अनधिकृत बांधकामे झाली आहेत. शहरातील सर्व सार्वजनिक विहीरी २ दिवसात गाळमुक्त करुन अनधिकृत बांधकामे दूर करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

बाटलीतील पाणी प्यायला दिले – यावेळी आंदोलकांनी नळाला येणारे पाणी बाटलीत भरुन आणले होते. अस्वच्छ पाणी नळाला येत असल्याने आमचे आरोग्य धोक्यात आले आहे हे पाणी तुम्हीच प्या अशी मागणी आंदोलकांनी करताच मुख्याधिकारी सर्वांसमक्ष बाटलीतील पाणी प्यायले..

पाण्याचा प्रश्न मार्गी लावू – यावेळी मुख्याधिकारी, तुषार बाबर यांनी आंदोलकांशी चर्चा करताना सांगितले की काही ठिकाणी पाईप लाईन टाकण्याचे काम चालू आहे. ज्याठिकाणी लिकेजीस आहेत ती लिकेजीस येत्या आठ ते दहा दिवसात काढली जातील. त्यानंतर पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

RELATED ARTICLES

Most Popular