अनंत चतुर्दशीला उघडीप घेतलेला पाऊस गुरुवारीही (ता. १९) गायब झाला आहे. त्यामुळे वातावरणात उष्णता वाढली असून, कडकडीत उन्हामुळे नागरिकांना ऑक्टोबर हीट जाणवत आहे. पावसाने उघडीप घेतली असून पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तापमान वाढल्यामुळे भात पिक करपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कापणी योग्य हळवी (कमी कालावधीत होणारी) भातशेती पुढील आठवड्यात पडणाऱ्या पावसाच्या तडाख्यात सापडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पिक पाहणी ऑनलाईन अहवालानुसार, यंदा जिल्ह्यात ४० लागवड करण्यात आली आहे.
ही बियाणी ९० ते १०० दिवसांत तयार होतात. यंदा जून महिन्यात मोसमी पाऊस वेळेवर दाखल झाला असला तरीही पुढे काही काळ पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे पेरणी पाच ते सहा दिवस उशिराने झाल्या. त्याचा परिणाम भातलावण्यांवर झाला. त्यामुळे हळवी बियाण्यांची तशी थोडी उशिरानेच लागवड झाली आहे; परंतु जुलै, ऑगस्ट या कालावधीत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधानी आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर ओसरला असला तरीही अधुनमधून सरी पडत होत्या; मात्र अनंत चतुर्दशीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे.
हळवी बियाण्यांची शेती कापणीयोग्य झालेली आहे. शेतकरी पावसाच्या विश्रांतीकडे लक्ष ठेवून आहेत; मात्र भात शेती कापणी योग्य झाली असली तरीही पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त आहे. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे उत्पादन अधिक येण्याची शक्यता आहे. दरम्यान, रत्नागिरी परिसरात आज २९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दुपारी १२ वाजता ३० अंश सेल्सिअसवर गेले. जिल्ह्यात आज सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी १.०३ मि.मी. नोंद झाली आहे.