27.1 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeSportsअश्विनचे शतक सहा बाद १४४ नंतर भारताची मजल ३३९ पर्यंत

अश्विनचे शतक सहा बाद १४४ नंतर भारताची मजल ३३९ पर्यंत

भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवस अखेर ६ बाद ३३९ धावांपर्यंत मजल मारली.

रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी ६ धावा आणि शुभमन गिल ० या भरवशाच्या फलंदाजांनी साफ निराशा केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या भारताची अवस्था ६ बाद १४४ अशी झालेली असताना फलंदाजीस आलेल्या आर. अश्विनने सर्व चित्रच पालटले. स्वतः शानदार नाबाद शतक (१०२) केले. रवींद्र जडेजासह (८६) नाबाद १९५ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवस अखेर ६ बाद ३३९ धावांपर्यंत मजल मारली. गेल्या चाळीस वर्षांत चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर कसोटी सामना चालू होत असताना नाणेफेक जिंकणारा कप्तान नेहमी फलंदाजी करायचा निर्णय घेत होता.

बांगलादेशी कप्तान नजमुल शांतोने नेमके उलटे केले. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा धाडसी निर्णय घेतला. हसन मेहमूदने अचूक मारा करून चार भारतीय फलंदाजांना बाद केल्याने कसोटी सामन्यात रंगत आली. संघाला अडचणीतून जडेजा अश्विनने नाबाद १९५ धावांची भागीदारी रचून बाहेर काढले. अश्विनचे हे सहावे कसोटी शतक आहे. एकदिवसीय किंवा द्वेन्टी-२० प्रकारास साजेशी अशी आक्रमकता अश्विनने दाखवली. १०२ धावांसाठी त्याने ११२ चेंडूंचा सामना केला. त्यात १० चौकार आणि २ षटकार मारले. एवढेच चौकार-षटकार रवींद्र जडेजानेही मारले; परंतु तो ११७ चेंडूत ८६ धावांवर नाबाद राहिला आहे.

दोन्ही संघांनी खेळपट्टीचा अंदाज लावून तीन वेगवान गोलंदाजांना संघात घेतले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा बांगलादेशचा धाडसी निर्णय हसन मेहमूदने सार्थ ठरवला. कप्तान रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहलीला हसन मेहमूदने पटापट बाद केले. रोहित शर्मा आणि कोहली टप्पा पडून बाहेर स्वींग होणाऱ्या चेंडूवर झेलबाद करताना हसनचे कौशल्य दिसून आले. प्रमुख फलंदाजांनी कसोटी सामन्या अगोदर कोणताही महत्त्वाचा सामना न खेळायची चूक केली होती तीच जणू त्यांना भोवली. ३ बाद ३४ धावसंख्येवर भारतीय संघ हेलकावे खात असताना यशस्वी जयस्वालला रिषभ पंत येऊन मिळाला.

यशस्वी आणि रिषभने मग चांगल्या चेंडूवर सावध फलंदाजी करताना खराब चेंडूंवर चौकार ठोकले. उपाहाराला हेच दोन फलंदाज नाबाद परतल्याने भारतीय संघाच्या गोटातील तणावाचे वातावरण जरा हलके झाले. ३९ धावा काढून जम बसला असताना रिषभ पंतने हसन मेहमूदला उगाच फटका मारायची घाई केली. पंत पाठोपाठ चांगली फलंदाजी करणारा यशस्वी जयस्वाल बाद झाला. जयस्वालने ९५ चेंडूत तीन तास खेळून अर्धशतक झळकावले होते. नंतर सांभाळून फलंदाजी करणारा के. एल. राहुल मेहदी हसन मिराजला बाद झाला. चहापानाला जडेजा अश्विनच्या जोडीने ३२ धावा जोडून ६ बाद १७६ धावसंख्या गाठली.

धावफलक – भारत, पहिला डाव ८० षटकांत ६ बाद ३३९. यशस्वी जयस्वाल झे. शादमन इस्लाम गो. नाहित राणा ५६, रोहित शर्मा झे. नजमुल शांतो गो. हसन महमुद ६, शुभमन गिल झे. लिटन दास गो. हसन महमुद ०, विराट कोहली झे. लिटन दास गो. हसन महमुद ६, रिषभ पंत झे. लिटन दास गो. हसन महमुद ३९ – ५२ चेंडू, ६ चौकार, केएल राहुल झे. झाकीर हुसन गो. मेहदी हसन मिर्झा १६, रवींद्र जडेजा खेळत आहे ८६ – ११७ चेंडू, १० चौकार, २ षटकार, आर. अश्विन खेळत आहे १०२ ११२ चेंडू, १० चौकार, २ षटकार.

बादक्रम – १-१४, २०२८, ३-३४, ४-९६, ५-१४४, ६-१४४.

गोलंदाजी – तस्किन अहमद १५-१-४७-०, हसन महमूद १८-४-५८-४, नाहिद राणा १७-२-८०- १, मेहदी हसन मिर्झा २१-२-७७-१, शकिब अल हसन ८-०-५०-०, मोईनुल हक १-०-४-०.

RELATED ARTICLES

Most Popular