गुरुवारी दुपारनंतर सुरू झालेला मुसळधार पाऊस रात्रभर देखील कायम होता. त्यामुळे येथील नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली होती. सतत पडणाऱ्या धो-धो पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पहाटे ४.३० वाजता संरक्षण भिंत कोसळून मातीचा प्रचंड भराव खाली आला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. खबरदारी म्हणून घाटातील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली व एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. शुक्रवारी दुपारनंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली त्यामुळे व्यापारी वर्गासह प्रशासनाने देखील मोकळा श्वास घेतला होता. यावर्षी सुरुवाती पासूनच पावसाची संततधार सुरू आहे.
कधी जोरदार पाऊस तर कधी स्वच्छ ऊन असे वातावरण सुरू असतानाच गुरुवारी सकाळपासून पावसाने जोरदार सुरुवात केली. दुपारनंतर पावसाचा जोर अधिक वाढला आणि मुसळधार असा पाऊस पडू लागला. महामार्गासह चिपळूण शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. वाशिष्ठी आणि शिवनदी या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. साहजिकच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने पुराचा धोका टळला.
पुराचे संकट टळले – गुरुवारी संपूर्ण रात्रभर पावसाचे धुमशान सुरू होते. त्यामुळे पहाटे पुन्हा चिपळूण शहरात अनंत आईस फॅक्टरी, लोटीस्मा परिसरात पाणी साचले होते. नाईक कंपनी परिसरात देखील पाण्याचा शिरकाव होऊ लागला होता. मात्र काही वेळेतच हे पाणी ओसरले होते. त्यामुळे बाजारपेठ सुरळीत सुरू होती. परंतु पावसाचे धुमशान मात्र सलग सुरू होते. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुराची भीती देखील व्यक्त करण्यात येत होती. परंतु नदीतील गाळ काढल्यामुळे यावेळी पुराचा धोका काहीप्रमाणात कमी झाला अशी प्रतिक्रिया देखील व्यक्त करण्यात येत होती.
संरक्षण भिंत कोसळली – मुसळधार पावसाचा फटका परशुराम घाटाला बसला. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेढे गावाला दरडी पासून संरक्षण मिळावे तसेच महामार्ग सुस्थितीत राहून वाहतूक सुरळीत रहावी यासाठी येथे सुमारे २०.० मीटर लांबीची आरसीसीची संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. शुक्रवारी पहाटे ४.३० वाजता या संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे मातीचा प्रचंड मोठा भराव ढासळला. तसेच येथील सर्विस रोडला देखील तडे गेले आहेत. सुदैवाने म ातीचा भराव पेढे गावाकडे तो सरकला नाही. मात्र पेढे ग्रामस्थांची भीतीने गाळण उडाली होती. भरावाची माती अद्यापही खाली सरकत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
प्रशासनाची धावाधाव – संरक्षण भिंत कोसळल्याचे सम जताच प्रशासनाची धावाधाव उडाली. तहसीलदार प्रवीण लोकरे, प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्यासह पोलिसांचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते. तर ठेकेदार कंपनीची टीम देखील तैनात होती. महामार्गाच्या काँक्रीटीकरणाला कोणताही धोका पोहचलेला नसला तरी खबरदारी म्हणून येथील एका बाजूची वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली. आणि एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. तसेच भराव बाजूला करण्याचे काम देखील सुरू करण्यात आले होते.
दुपारनंतर पावसाची विश्रांती – शुक्रवारी दुपार नंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. स्वच्छ असे ऊन आणि पावसाची एखादी सर असे वातावरण दुपारनंतर चिपळूणमध्ये दिसून येत होते. तसेच नद्यांची पाणी पातळी देखील मूळ पात्राकडे सरकत होती. त्यामुळे व्यापाऱ्यांसह प्रशासनाने देखील मोकळा श्वास घेतला होता. मात्र एनडीआरएफचे पथक परशुराम घाटात व शहरात देखील सज्ज ठेवण्यात आले आहे. चिपळूण नगरपालिकेचे आपत्तीनिवारण पंथक देखील तयार ठेवण्यात आले आहे.