रत्नागिरीतील हिंदू समाज अस्वस्थ आहे. सध्या लागूलचालनाचे विषय सुरू आहेत. किल्ल्यावर अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली नाही. आता रत्नागिरीतील हिंदू समाज तिसरा डोळा उघडेल, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले. जागृत हिंदू समाजाने दोन दिवसांपूर्वी बांगलादेशातील हिंदूंच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. त्या पार्श्वभूमीवर नीतेश राणे यांनी आज दौरा केला. शनिवारी त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मानतो मग हिंदूंना वेगळा न्याय का ? शासकीय जागेत टपरी बांधली की, ती तोडण्यासाठी दोन तासांत पोलिस फोर्स मागवली जाते; पण अनधिकृत बांधकामांवर प्रशासन कारवाई का करत नाही? निवेदने देऊन, मोर्चे काढून हिंदूंचा संयम संपला आहे.
आता आम्हाला प्रशासनाने तारीख द्यावी. हिंदू आक्रमक झाला तर याला पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी, नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील. हिंदूंचा मोर्चा असला तरी बॅरिकेट्स लावली जातात. हा फरक थांबला नाही तर हिंदू समाज तिसरा डोळा उघडेल मग हिंदू समाज ताब्यात राहणार नाही. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू केला आहे; पण कत्तलखाने कसे सुरू आहेत, हा प्रश्न आज पोलिस अधीक्षकांना विचारला. ते व्यवस्थित उत्तर देऊ शकले नाहीत. मुख्य आरोपी अजून अटकेत नाही. इथे गोमांस विकणारे, कत्तलखाने चालवणारे आहेत त्यांची नावे पोलिस आणि प्रशासनाकडे दिली आहेत.