कॅलिफोर्नियापेक्षाही सुंदर रत्नागिरी आहे. निसर्गाची श्रीमंती, आध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धी, मनाची श्रीमंती हे सर्व येथे आहे. त्यामुळे रत्नागिरीचे भविष्य उज्ज्वल आहे. कारण उदय सामंत हे कृतीचे नेतृत्व करत आहेत. आचार आणि विचार दोन्ही एकत्र येतात तेव्हा हे सर्व पाहायला मिळते. विशेषतः त्यांनी शैक्षणिक विकासावर भर दिला त्याचे अप्नुप आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी आज येथे काढले. वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित उदय पर्व, कार्य अहवाल प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे, उद्योजक अण्णा सामंत, मुन्ना सुर्वे, उद्योजक दीपक गद्रे, श्रीरंग कद्रेकर आदी उपस्थित होते. डॉ. माशेलकर म्हणाले, न्यू एज्युकेशन पॉलिसी २०-२० पुढे नेण्यात उदय सामंत यांचा फार मोठा वाटा होता. मंत्रिमंडळातून मंत्री सामंत यांच्या माध्यमातून तो पुढे नेण्यात आला. शैक्षणिक विकास हा समाजाचा सर्वांगीण विकास असून, तो शिक्षणावर अवलंबून असतो. त्या दृष्टीने शिक्षणाकडे डोळस, जागरूकपणे पाहून विद्यार्थ्यांना नव्या वाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
२००६ मध्ये भारताने स्टार्टअपच्या माध्यमातून हनुमान उडी घेतली. शेतकऱ्याचा मुलगा देखील ज्ञानाधिष्ठित विकास करू शकतो, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, भविष्य तुमच्या हातात आहे. शिक्षण हा वृक्ष त्यातला भाग आहे. त्यामुळे शिक्षक घडवणे खूप महत्वाचे आहे. जेथे शिक्षकाला प्रतिष्ठा नाही तो देश विकसित होऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक बनले पाहिजे. त्यासाठी बुद्धीसंवर्धन, व्यक्ती संवर्धन, क्षमता संवर्धन, मूल्य संवर्धन व्हायला पाहिजे तरच चांगला माणूस घडण्यास मोलाची मदत होईल.
सलोखा टिकवा : नाना पाटेकर आम्ही कोणता पक्ष ओळखत नाही, आम्ही पाहतो तो विकास सामंत तुम्ही कमावलेली माणसं हीच तुमची पोचपावती आहे. सामंत तुम्ही केलेल्या कामाबद्दल खोटे काही दाखवले नाही, यात समाधान आहे. प्रत्येक राजकीय नेत्याने आपला अहवाल दिला पाहिजे अशा शब्दांत अभिनेते नाना पाटेकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे कौतुक केले. साहेब म्हटले की, अंतर वाढते. अंतर ठेवू नका. साहेब ही उपाधी काढून टाका. तुमच्याकडे पाहून समाधान वाटते. जनता हीच तुमची बॉडीगार्ड आहे. गरजेचे आहे तेवढेच ठेवा बाकी समाजाला परत करा. सलोखा टिकवा, रत्नागिरी ही पवित्र भूमी आहे, तिला धक्का लावू देऊ नका, कोणाला नाव ठेवण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपल्याला एकत्र राहायचे आहे, हे लक्षात ठेवा असेही पाटेकर, यांनी यावेळी सांगितले.