रत्नागिरी एमआयडीसीमध्ये असलेल्या माशांवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांमध्ये प्रत्यक्षात ८० टक्के परप्रांतीय कामगार कार्यरत आहेत. याठिकाणी स्थानिकांना संधी द्या, अशी मागणी मनसे कामगार सेनेचे रत्नागिरी जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर यांनी सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. रत्नागिरी एमआयडीसीमध्ये माशांवर प्रक्रिया करून त्याचे खत व तेल काढण्याचे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामधून प्रदूषण होत असल्याची तक्रार वारंवार केली जात आहे. तसेच या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामागारांना ज्या सुविधा देणे अपेक्षित आहे, त्या दिल्या जात नाहीत. आरोग्य सुविधांकडेही दुर्लक्ष केले जात आहे. प्रत्येक कंपनीत ८० टक्के स्थानिक कामगारांची भरती असलीच पाहिजे. मात्र, प्रत्यक्षात तिथे ८० टक्के परप्रांतीय कामागार कार्यरत आहेत. महाराष्ट्राबाहेरून बस भरून कामगार आणले जातात. याची कामगार आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेतली पाहिजे.
स्थानिक कामगारांचा विचार केला, तर निश्चितच येथील बेरोजगारी दूर होईल. त्याचबरोबर काही कंपनीत मासे हाताळणीसाठी दिलेले ग्लोज ठराविक वेळेनंतर बदलणे आवश्यक आहे. तसे केले नाही तर त्वचेचे विकार उद्भवू शकतात. मात्र, याबाबत संबंधितकंपन्यांकडून लक्ष दिले जात नसल्याचे पाहायला मिळाले आहे. काही ठिकाणी हजेरी पुस्तकामध्ये प्रत्यक्षात काम करत असलेल्या कामगाररांपेक्षा कमी कामगारांची नोंद आहे. कामगारांना भविष्य निर्वाह निधीची सेवा दिली जात नाही. कामे करत असलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे विशेष लक्ष दिले जात नाही. या सर्व गोष्टी संबंधित कंपन्यांकडून करून घ्याव्यात, अशी मागणी मनसेतर्फे दिलेल्या निवेदन व चर्चेदरम्यान करण्यात आली आहे. मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हा कार्यकारिणीकडून काही दिवसांपूर्वी कामगारांच्या प्रश्नांचा आढावा घेतला होता. त्यामध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी आयरे यांना निवेदन देण्यात आल्याचे गुळेकर यांनी सांगितले.