दापोली तालुक्यातील ओळगांव गावाने गावाबाहेरील लोकांना जमिनी खरेदी करण्यावर मज्जाव केला आहे. गावाचा ठेवा जोपासण्यासाठी आणि आपली जागा आपल्यापाशी राहण्यासाठी घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय कोकणातील नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरणार आहे. असा निर्णय घेणारे ओळगांव हे तालुक्यातील पहिलेच गाव ठरले आहे. गावाच्या वेशीवर तशा आशयाचे फलकही लावण्यात आले आहेत. वडिलोपार्जित जमिनी परप्रांतियांच्या घशात घातल्या जात असल्याने अनेक समस्या सध्या उद्भवत आहेत. परप्रांतियांना जमिनी विकल्याचा अनेकांना आता पश्चातापही होत असल्याचे समोर आले आहे.
कमी किमतीत जमिनी घेऊन जमिनींना कंपाऊंड घालून तेथे विकासात्मक कामे करून अर्थात इमारती, घरे बांधून दामदुप्पट किमतीला विकल्या जातात. या खरेदीदारांमुळे अनेक समस्या देखील निर्माण होतात. दलालांच्या आमिषाला बळी पडून कोकणातील माणूस आपल्या वडिलोपार्जित जपलेल्या जमिनी परप्रांतियांच्या हवाली करून स्वतः भूमिहीन होत आहे; मात्र ओळगांव या गावाने या साऱ्या समस्यांचा सारासार विचार करून पुढे पाऊल टाकून बाहेरील लोकांना जागा खरेदीवर बंदी घातली आहे.
ओळगांवमधील ग्रामस्थांनी एकत्र येत कुणीही गावाबाहेरील व्यक्तीला जमिनी विकायच्या नाहीत, असा निर्णय घेतला शिवाय गावाच्या वेशीवर बाहेरील लोकांना जागा खरेदी करण्यास सक्त मनाई आहे, असा फलकही लावला आहे. काही दिवसांपूर्वी गावातील एक जमीन बाहेरील व्यक्तीने खरेदी केल्याची कुणकुण गावकऱ्यांना लागली. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्रित येत बाहेरील व्यक्तीला जमिनी विकायच्या नाहीत, असा कठोर निर्णय घेतला. वडिलोपार्जित जमिनी परप्रांतिय लोकांना विकून गावच विकण्यासारखे आहे. त्यामुळे आपल्या जमिनी अन्य गावातील लोकांना न देण्याचा जो निर्णय ओळगावने घेतला तसा निर्णय प्रत्येक गावाने घेणे गरजेचे बनले असल्याचे आता दापोलीत बोलले जात आहे.