24 C
Ratnagiri
Tuesday, February 24, 2026

लांजातील चार गावांना वादळी पावसाचा तडाखा

महाशिवरात्रीनंतर थंडी गायब होऊन तापमानात वाढ झाली...

कोकणात १९८ जादा फेऱ्यांचे नियोजन शिमगोत्सव, होळीसाठी ‘लालपरी’ सज्ज

मुंबई, ठाणे परिसरात स्थायिक झालेल्या कोकणी बांधवांना...

रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणार ९.५ कोटींची ‘स्किल लॅब’

राज्यातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि भावी...
HomeDapoliउन्हवरेतील गरम जल कुंड उदासीनतेचे बळी…

उन्हवरेतील गरम जल कुंड उदासीनतेचे बळी…

ग्रामपंचायतीकडून सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही.

दापोली तालुक्यातील एकमेव गरम पाण्याचे कुंड असलेले पर्यटनस्थळ म्हणजे उन्हवरे होय. याची वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून ओळख आहे. शासनाकडून या कुंडांना पर्यटनाचा ‘क’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे; मात्र प्रत्यक्षात शासनदरबारी अनेकवेळा पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध न झाल्यामुळे येथील कुंडांचा विकास थांबलेला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे दर्जालाच तडा गेला आहे. उन्हवरे हे गाव दापोलीपासून ३५ किलोमीटरवर असून, चारही बाजूने डोंगराने वेढले आहे. येथील गरम पाण्याच्या कुंडातील गंधकयुक्त गरम पाणी हे त्वचारोगांसाठी गुणकारी मानले जाते. तसेच, या पाण्याने स्नान केल्यामुळे दिवसभराचा थकवा दूर होतो. त्यामुळे येथे वर्षभर जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. शालेय सहली, पर्यटक तसेच ज्येष्ठ नागरिक विशेष आवडीने येथे भेट देतात.

मात्र, महिलांसाठी असलेली स्नानगृहे अत्यंत जीर्णावस्थेत असून, सुरक्षितता व गोपनीयतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कपडे बदलण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज व प्रकाशयोजना यांचा अभाव असल्याने अनेक पर्यटक नाराजी व्यक्त करतात. या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे ५० लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. त्यामध्ये सुशोभीकरण, संरक्षक भिंती, स्वतंत्र स्नानगृहे, मार्गदर्शक फलक व प्रकाशयोजना आदी कामांचा समावेश होता. अद्याप त्या प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्याने सर्व विकासकामे कागदावरच आहेत.

निधीचा अभाव – गरम पाणी कुंड ग्रुपग्रामपंचायत उन्हवरे यांच्या मालकीचे असून, ग्रामपंचायतीकडून सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही. मर्यादित साधनसंपत्तीमुळे स्थानिक पातळीवर तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात असल्या तरीही अपेक्षित पर्यटन विकास मात्र रखडलेला आहे. पर्यटनाच्यादृष्टीने मोठी क्षमता असलेले उन्हवरे गरम पाणी कुंड शासनाच्या ठोस निर्णयांच्या प्रतीक्षेत असून, तातडीने निधी मंजूर करून सुशोभीकरण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी पर्यटक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्मिती – शेकडो वर्षापूर्वी या परिसरात ज्वालामुखीचा उद्रेक झाला असावा आणि त्यामधून गंधयुक्त गरम पाण्याच्या कुंडाची निर्मिती झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याला येथील स्थानिक लोकांकडून दुजोरा मिळत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular