जिल्ह्यात पर्यटनाच्या आणखी काही वाटा खुल्या होणार आहेत. पर्यटन वाढीसाठी सिंधुरत्न विकास योजने अंतर्गत जिल्हा परिषदेतर्फे ४ आधुनिक बस आणि ५ आलिशान, आकर्षक हाऊस बोटी बांधण्यात आल्या आहेत. १ कोटी ३२ लाखांचा बसचा तर ५ कोटींचा बोटींचा हा प्रकल्प आहे. या पथदर्शी प्रकल्पाला महिला सक्षमीकरणाची जोड देण्यात आली आहे. बचत गटांच्या प्रभागसंघांकडून या बस आणि बोटी चालविल्या जाणार आहेत. केरळ प्रमाणे हाऊस बोटिंग आणि अलिशान बसचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. सिंधुरत्न योजनेतून या प्रकल्पाला निधी मंजूर झाला आहे. त्यातून अलिशान चार बस खरेदी करण्यात आल्या आहेत.
एक बस साधारण २८ लाखांच्या दरम्यान आहे. सतरा आसनी या गाड्या आहेत. एसी, चार्जीग पॉइंडसर करमणुकीची साधने त्यामध्ये आहेत. रत्नागिरी, संगमेश्वर दर्शनासह अन्य ठिकाणी या बस जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा ठेवण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुक्याला २, संगमेश्वर १ आणि दापोली तालुक्याला १ बस दिली जाणार आहे. ५ कोटींचा हा प्रकल्प आहे. एक बोट १ कोटीची आहे, अशा ५ बोटी खरेदी करण्यात आल्या आहेत. अलिशान आणि आकर्षक अशा त्या बोटी आहेत. त्यामध्ये २ बेडरुम, एसी, नाष्ता, जेवण आदींची सुविधा आहे.
जयगड ते दाभोळ असा खाडी जलमार्ग त्यासाठी निश्चित केला आहे. चिपळुण येथे मगर सफरचाही यात विचार आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी जिल्हा परिषद मुख्याधिकारी कीर्तिकीरण पूजार यांनी पुढाकार घेतला. त्याला आता लवकरच मुहूर्त स्वरूप येणार आहे. महिला होणार स्वावलंबी दोन्ही प्रकल्प महिला बचत गटांच्या प्रभाग संघाला दिल्या जाणार आहे. एका प्रभाग संघामध्ये सुमारे ५० बचत गट असतात. या गटांना वेगवेगळे पॅकेज दिले जाणार आहे. कोणाकडे जेवणाची व्यवस्था, बोट पार्किंग-देखभालचे पॅकेज अशी छोटी-छोटी पॅकेज तयार करून बचत गटाच्या महिलांना स्वावलंबी केले जाणार आहे.