शहरातील मुरुगवाडा ते मिऱ्या दरम्यान पंधरामाड परिसरात खवळलेल्या समुद्रातील लाटांच्या तुफानी माऱ्यामुळे मिऱ्या बंधाऱ्याला भगदाड पडलें आहे. त्यामुळे या भागातील नागरिक भितीच्या छायेखाली वावरत आहेत. समुद्राच्या उंचच उंच लाटा बंधाऱ्याला धडकून वस्तीच्या दिशेने येत असल्याने रहिवासी धास्तावले आहेत. गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर किनारपट्टीला उधाणाच्या लाटांचा दणका बसला. नारळी पोफळीच्या बागायतींचे नुकसान झाले. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे व जोरदार वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून जोरदार लाटांचा प्रहार किनाऱ्यावर होतो आहे.
रत्नागिरी शहरात मुरुगवाडा ते मिऱ्या दरम्यान किनाऱ्यावर लाटांचा मारा होत आहे. याठिकाणी असणाऱ्या जुन्या बंधाऱ्याला लाटांच्या माऱ्याने भगदाड पडले आहे. या बंधाऱ्याचे दगड लाटांच्या माऱ्याने समुद्रात सरकत आहेत. तर त्यामुळे पडलेल्या भगदाडातून पाणी आत नागरी वस्तीच्या दिशेने येत आहे. मिऱ्या ते मुरुगवाडा दरम्यान बंधाऱ्याचे काम सुरु असून त्यातील शंभर ते दोनशे मीटरचे काम शिल्लक आहे. या शिल्लक असलेल्या ठिकाणीच आता भगदाड पडले आहे. उर्वरीत किनारा सुरक्षित करण्यासाठी बंधाऱ्यावर टेट्रापॅड टाकण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे लाटांचा मारा कमी करण्यासाठी गोवन पध्दतीचे बंधारेही टाकण्यात आले आहेत.
ज्याठिकाणी पंधरामाड परिसरात बंधाऱ्याला भगदाड पडले आह, त्या भागातील काम पाऊस कमी झाल्यानंतर सुरु केले जाणार आहे. पुढील पावसाळ्यात या भागाला धौका जाणवणार नाही. परंतु यावर्षीचा पावसाळा येथील नागरिकांना भितीच्या छायेखालीच घालवावा लागणार आहे. गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील समुद्राला काल दुपारी मोठे उधान आले होते. या उधानामुळे समुद्र पूर्ण खवळलेला होता. समुद्राच्या पाण्याचा रंगही लाल झाला होता. उंच उंच लाटा किनाऱ्याला येऊन धडकत होत्या. समुद्राच्या लाटा किनाऱ्यालगत असणाऱ्या नारळी पोफळीच्या बागायतीत शिरत होत्या.
तसेच लाटांच्या तडाख्याने समुद्रालगत असलेल्या एका हॉटेलचा बांध अर्धा अधिक कोसळला होता. समुद्राच्या कडेला असलेल्या बांधांना लाटांच्या पाण्याच्या माऱ्याने भगदाड पडले आहे. समुद्रांने काल दुपारी रुद्र अवतार धारण केला होता. दुपारी गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील समुद्राला उधानचे पाणी किनाऱ्याला येऊन धडकत होते. समुद्रालगत असलेली अर्धी अधिक जमीन पाण्याने गिळंकृत केले. रायगड जिल्ह्यातही उधाणाच्या लाटांनी हाहाकार माजविला होता. ३ ते ४ मीटर उंच लाटा उसळत होत्या. अनेक ठिकाणी संरक्षक भिंतीचे मोठमोठे दगड उधाणाने उडवून लावले. एका ठिकाणी बंधाऱ्याला भगदाड पडले.