26.1 C
Ratnagiri
Tuesday, September 17, 2024
HomeRatnagiriगुहागरातील सांडपाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष

गुहागरातील सांडपाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष

टाक्या भरल्याने सांडपाणी घरात येत आहे.

गुहागर नगरपंचायतीने सांडपाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही. चर्चेसाठी प्रशासनाकडून वेळ दिला जात नाही. स्वच्छतेसारख्या गंभीर विषयात होणारी चालढकल पाहून गुहागर शहरातील शिवराम सहकारी गृहनिर्माण संस्थेने स्वातंत्र्यदिनी नगर पंचायतीसमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. याचे निवेदन गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नगर पंचायतीला दिले. गुहागरमधील पहिला गृहनिर्माण प्रकल्प म्हणून शिवराम प्लाझाकडे पाहिले जाते. या गृहनिर्माण संस्थेने ४८ सदनिकांमध्ये जवळपास १५० लोक राहतात. या गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकाधारकांना बाजूला असलेल्या पाणी झिरपण्याची क्षमता संपलेल्या (वॉटर टेबल लॅण्ड) जमिनीमुळे सांडपाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे.

सांडपाण्याच्या टाक्या भरल्या की, त्यातील पाणी गृहनिर्माण संस्थेत तळमजल्यावर राहणाऱ्या सदनिकाधारकांच्या संडास व बाथरूममध्ये साठून राहाते. ही समस्या सोडवण्यासाठी मे महिन्यात शिवराम गृहनिर्माण संस्थेच्या समितीने नगर पंचायतीची तोंडी परवानगी घेऊन एक सांडपाणी वाहिनी गुहागर बसस्थानकाशेजारील गटारात सोडली होती. त्यासाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च आला; मात्र हे काम झाल्यावर बसस्थानक परिसरातील काही व्यापारी व ग्रामस्थांनी नगर पंचायतीकडे गटारात सोडलेल्या सांडपाण्याच्या वाहिनीबाबत तक्रार केली. या तक्रारीवरून कार्यवाही करताना नगर पंचायतीने शिवराम गृहनिर्माण संस्थेने टाकलेली सांडपाणी वाहिनी तोडून जप्त केली.

जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यावर या संस्थेतील तळमजल्यावरील सदनिकाधारकांना सांडपाण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. टाक्या भरल्याने सांडपाणी घरात येत आहे. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शिवराम गृहनिर्माण प्रकल्पाच्या समितीने नगर पंचायतीकडे अनेकवेळा पत्रव्यवहार केला; मात्र त्याची दखल नगर पंचायतीने घेतली नाही. चर्चेसाठी वेळ मागितला, त्याबाबतही उत्तर मिळत नाही. मुख्याधिकारी उपलब्ध नाहीत, असे सांगण्यात आले. त्यामुळे अखेर स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा मार्ग शिवराम गृहनिर्माणमधील सदनिकाधारकांनी स्वीकारला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular