रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्राण्यांच्या अवयवांची तस्करी, अमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक, अवैध विक्री, व्हेलमाशाची उलटी असे अनेक प्रकारचे गुन्हे घडताना थोड्या फार दिवसांच्या फरकाने दिसून येत आहेत. परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील सतर्क पोलिसांच्या कामकाजामुळे अशा गुन्ह्यांना वेळीच आळा बसत आहे. आणि गुन्हेगाराना सुद्धा वेळीच रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश मिळत आहे.
खेड पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, मुंबई गोवा महामार्ग वरील रिलायन्स पेट्रोलपंप परिसरामध्ये गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या एकाला सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याच्या कडून ८ किलो वजनाचा बेकायदेशीर रित्या विक्रीला आणलेला गांजा व कार असा तब्बल ४ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची घटना २ नोव्हेंबरला रात्रौ ९ वाजण्याच्या दरम्यान घडली.
हा अंमली पदार्थ अवैध रित्या विक्री करण्यासाठी महाबळेश्वर जि. सातारा येथुन आलेला गुन्हेगार रियाज तांबोळी रा. कोळी आळी, महाबळेश्वर, जि. सातारा याच्यावर धाड टाकून त्याला १, लाख २६ हजार रुपये किंमतीचा ८ किलो ४१० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बाळगलेल्या स्थितीत रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
संशयिताकडून गांजा हा अंमली पदार्थ, चारचाकी वाहन, मोबाईल फोन असे साहित्य असा एकूण ४,लाख ७८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जागी जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थांची विक्री त्याचप्रमाणे वन्य जीवांच्या अवयवांची तस्करी करण्याचे प्रकार सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडत असल्याने, अशा गुन्हेगारांवर पोलीस आपली करडी नजर ठेवून असल्याने योग्य वेळी गुन्हेगारांना मुद्देमालासह जेरबंद करणे शक्य होत आहे.