मतदानासाठी वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन (ईव्हीएम) याबाबत अनेक गैरसमज लोकांमध्ये आहेत; परंतु हे मशिन कोणत्याही वायरीने किंवा वायरलेस यंत्रणेने हॅक करता येत नाही. त्यामधील कोणताही डाटा काढता येत नाही किंवा नवीन अपलोड करता येत नाही. तसे करण्याचा प्रयत्न केल्यास ते डिसेबल होईल. अतिशय सुरक्षित असे हे ईव्हीएम मशिन आहे, असा दावा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते गेल्या काही निवडणुकांचा निकाल पाहता ईव्हीएम मशिनवर अनेकांनी शंका व्यक्त केली होती. कोणतेही बटन दाबले तरी एकाच व्यक्तीला मतदान होते.
त्यामुळे ते निवडून येतात, असे आरोप देखील विरोधकांनी केले होते. त्यामुळे ईव्हीएम मशिनऐवजी मतदान पत्रिकेवर मतदान घ्यावे, अशी मागणी काँग्रेससह काही पक्षांनी केली होती. ईव्हीएम मशिनबाबत आजही अनेकांच्या मनात संशय आहे. “मशिन हॅक केली जाते, वस्तुस्थिती काय आहे, असा प्रश्न पत्रकारांनी मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांना केला. यावर ते म्हणाले, “ईव्हीएम मशिन अतिशय अद्ययावत आहे. त्यामध्ये प्रत्येकवेळी नवे बदल करण्यात येऊन ते अधिक सुरक्षित होत गेले आहे. अतिशय पारदर्शक अशी प्रक्रिया आहे. त्यामुळे ईव्हीएम मशिन हॅक करणे, त्यामध्ये बदल करणे हे शक्य नाही. निवडणुकीतील मतदान प्रक्रिया अतिशय पारदर्शक होते.